नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांची आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधात सुरू असलेला विभागीय चौकशी समितीचा तपास अंतिम टप्प्यात असताना सातपैकी चार तक्रारकर्त्यांनी माघार घेतली आहे. ज्यांनी धवनकर यांना पैसे दिल्याचे मान्य केले होते त्यांनीच माघार घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण आले आहे. शिवाय त्यांच्या तक्रारीच्या आधारावर दहा महिन्यांपासून विद्यापीठाने चौकशी केली असताना ऐन वेळेवर तक्रार मागे घेतल्याने त्यांचीच चौकशी का नको? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप असलेल्या डॉ. धवनकर यांच्या पराक्रमाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडले होते. हे सात प्राध्यापक धवनकर यांच्या जाळ्यात कसे सापडले, त्यांच्यावर कुठला दबाव होता, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. धवनकर प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश अजय चिंतामण चाफले यांच्या समितीने आपला अहवाल कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना सोपवला होता. चाफले यांनी सातही तक्रारकर्त्यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. तक्रारकर्ते शेवटपर्यंत आपल्या तक्रारीवर ठाम होते. त्यांनी धवनकर यांनी कशी फसवणूक केली याची संपूर्ण माहिती दिली. प्राथमिक चौकशी समितीने धवनकर यांची विभागीय चौकशी करावी अशी शिफारसही केली. त्यामुळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश समीर दास यांच्या समितीने धवनकर प्रकरणाची चौकशी केली. समितीचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा… पारदर्शक परीक्षेसाठीच शुल्कवाढ; राज्य शासनाचा दावा, मात्र स्पर्धा परीक्षार्थीमध्ये रोष
मात्र, या संपूर्ण प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. सात तक्रारकर्त्यांमधून एक प्राध्यापक विभागीय चौकशीला आलेच नाही. दोन तक्रारकर्त्यांना केवळ धमकावले होते परंतु त्यांनी पैसे दिले नाही. मात्र, ज्या चार प्राध्यापकांची फसवणूक होऊन त्यांनी पैसे दिल्याची तक्रार केली होती त्यांनीच दोन्ही पक्षांमध्ये सहमतीने माघार घेत असल्याचे कबूल केले. असेच आता कुठलेही आर्थिक देणे-घेणे नाही असेही लिहून दिले. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण आले आहे.
माघार घेणाऱ्यांची चौकशी का नाही?
तक्रार मागे घेणाऱ्या या चार प्राध्यापकांची फसवणूक झाल्यामुळे विद्यापीठाने धवनकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. तसेच प्राथमिक व विभागीय चौकशीही लावली. मात्र, आता त्यांनीच माघार घेतल्याने या प्राध्यापकांचीच चौकशी करावी असाही सूर विद्यापीठ वर्तुळात आहेत. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी तक्रारकर्त्यांना संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.