गोंदिया : बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्स आणि बालाघाट जिल्हा पोलीस दलाला नक्षलवादी कारवायांविरोधात मोठे यश मिळाले आहे.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोध मोहीम राबविताना ठाणे गढीच्या सूपखार वन परिक्षेत्राच्या रोंडा फॉरेस्ट कॅम्पजवळ हॉकफोर्स, बालाघाट जिल्हा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

बालाघाट पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मारल्या गेलेल्या ४ महिला नक्षलवाद्यांकडून एक इन्सास रायफल, एक एसएलआर रायफल आणि एक ३०३ रायफल आणि दैनंदिन वापरातील इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहे. ठार करण्यात आलेल्या चार महिला नक्षलवाद्यात २० लाखाच्या इनाम असलेली भोरमदेव एरिया कमेटीची कमांडर आशा रा. दक्षिण बस्तर जिल्हा सुकमा छत्तीसगढ, १४ लाख इनाम असलेली भोरमदेव एरिया कमेटीची सदस्य शीला उर्फ पद्मा उर्फ सरिता रा. पेंटा / जगरगुंडा जिल्हा सुकमा छत्तीसगढ, १४ लाख इनाम असलेली भोरमदेव एरिया कमेटीची सदस्य रंजिता रा. जिल्हा कोंडगाव छत्तीसगड, १४ लाख इनाम असलेली भोरमदेव एरिया कमेटीची सदस्य लख्खे मडावी जिल्हा सुकमा छत्तीसगढ अशी या चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांची नावे आहे.

या चकमकीत काही महिला नक्षलवादी जखमी झाल्या आहेत. चकमकीनंतर घनदाट जंगलाचा फायदा घेऊन ते पळून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांचा शोध घेण्यासाठी १२ पोलिस पथकातील ५०० हून अधिक पोलिस बळ अजूनही हॉकफोर्स, सीआरपीएफ कोब्रा आणि बालाघाट जिल्हा पोलीस दलाच्या पथकांकडून जखमी नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी जंगलात शोध सुरूच आहे.

चकमकी दरम्यान जखमी झालेल्या आणि घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पळून गेलेल्या काही नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी सीआरपीएफ, हॉक फोर्स आणि जिल्हा पोलिस दलांकडून या परिसरात मोठ्या प्रमाणावर सखोल शोधमोहीम केंद्र सरकारच्या धोरणानुसार राबवली जात आहे.

बालाघाट जिल्ह्यातून नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी नक्षलविरोधी मोहिमेत अधिक गतिमानता आणून लवकरच जिल्ह्यातून नक्षलवादाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी बालाघाट जिल्हा पोलीस आपल्या सहकारी पथकांसह तत्पर असल्याची माहिती बालाघाट जिल्हा पोलीस अधीक्षक नागेंद्र सिंग यांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बालाघाट येथे घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत दिली.