नागपूर : मागासवर्गीय मुलामुलीची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलामुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहे. सदरची योजना १९२२ पासून कार्यान्वित आहे. सद्यः स्थितीत नागपूर जिल्ह्यात १३ मुलांची व १२ मुलींची, अशी एकूण २५ शासकीय वसतिगृहे व एक नोकरी करणाऱ्या महिलांचे शासकीय वसतिगृह आहे. तर राज्यात पाचशेहून अधिक वसतिगृह सुरू आहेत. सामाजिक न्याय विभागाचे नाशिक जिल्ह्यातील मोशी येथे मुलींचे वसतिगृह आहे. २५० विद्यार्थिनींची क्षमता असणारे हे वसतिगृह असून त्याची नियमावली कडक आहे. ती असायलाच हवी, कारण शेवटी मुलींची सुरक्षा महत्त्वाची आहे. परंतु, दोन दिवसांपूर्वी वसतिगृहाच्या गृहप्रमुख मीनाक्षी नारहारे यांनी एक अजब निर्णय घेतला.
एका खोलीत चार मुली राहतात. त्यापैकी एका विद्यार्थिनीने ऑनलाईन पिझ्झा मागवला, म्हणून त्यांना अधिकृत नोटीस पाठवण्यात आली आणि त्यांचा वसतिगृह प्रवेश एका महिन्यासाठी रद्द करण्यात आला. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनाही गृहप्रमुखांनी बोलावले. त्यांच्याशी त्यांच्या शैक्षणिक बाबींऐवजी इतर अनावश्यक मुद्यावर चर्चा करून त्यांना समज देण्यात आली. पालक विनवण्या करत होते, पण उपयोग झाला नाही.गावावरून केवळ या क्षुल्लक कारणासाठी पालकांना कामधंदा सोडून बोलवण्यात आले. अशा संवेदनाहीन व निष्ठूर गृहप्रमुखांवर कारवाई करावी. नेमक्या कोणत्या नियमावलीनुसार विद्यार्थिनींना प्रवेशबंदी घातली याचा लेखी करावा. केवळ पिझ्झा मागवला, त्यांनी अंमली पदार्थ किंवा शस्त्र मागवले नाही. विद्यार्थिनींची बदनामी करून कायद्याचा दुरुपयोग केला म्हणून समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बोखरिया यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी स्टुडंट हेल्पिंग हँड्सचे अध्यक्ष ॲड. कुलदीप आंबेकर यांनी केली आहे.
काय आहेत अटी व शर्ती
१) गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
२) विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
३) प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न अनु. जातीकरिता २.५ लाख व इमाव करिता १,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.
४) इयत्ता ८ वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
५) अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यासाठी १५ मे पूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी ३० जून पर्यत किंवा निकाल लागल्यापासून १५ दिवसांचे आंत.
शासकीय वसतिगृहातील सोयी-सुविधा
१) मोफत निवास व भोजन, अंथरूण पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
२) शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश दिले जातात.
३) क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी
४) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, ऍप्रॉन, ड्रॉईंग बोर्ड
५) बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉइंग बोर्ड, ब्रश कॅनव्हास इत्यादी.
६) वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता दिला जातो.
७) वसतिगृहांमध्ये वाचन प्रेरणा उपक्रम राबविण्यात येतो.