वर्धा : अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्याचे प्रयत्न पोलीस खाते आपल्या परीने करीत आहे.पकडलेला गांजा हा अवैध विक्रीचे तसेच वाढत्या व्यसनाचे प्रतीक म्हणून त्यास सर्वसमक्ष पेटवून देण्याचा निर्णय झाला. निमित्त होते अमली पदार्थ विरोधी दिनाचे. या दिवशी खात्याने शाळकरी मुलांची संदेश यात्रा काढून जनजागरण केले.झोपडपट्टी परिसरात अमली पदार्थांच्या वाईट परिणामांबाबत उद्बोधन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी अमली पदार्थाच्या विक्रीस आळा घालण्याचे सर्व ते प्रयत्न होत असल्याचे नमूद केले.अपर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे यांनीही संबोधले.त्यानंतर पोलीस मुख्यालयातील निर्जन परिसरात सव्वा चारशे किलो गांजा पेटवून देण्यात आला. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या छापेमारीत हा गांजा पकडण्यात आला होता,असे अमली पदार्थ विल्हेवाट समितीचे पोलीस उपअधीक्षक कांचन पांडे यांनी नमूद केले. गुन्हे शाखेचे संजय गायकवाड तसेच कमलाकर घोटेकर,गिरीश कोरडे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा या कारवाईत समावेश होता.