बुलढाणा : शेतातील पिकावर जहाल कृषी औषधीची फवारणी सुरू असताना एकाच परिवारातील चौघे सदस्य अत्यावस्थ झाले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला तर दोन महिलांसह तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या घाटाखालील भागातील मोताळा तालुक्यात येणाऱ्या धामणगाव बढे गावाच्या शिवारात आज गुरुवारी, १८ जुलै रोजी ही दुर्देवी आणि तितकीच धक्कादायक घटना घडली. या घटनेचा विस्तृत तपशील मिळाला नसून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार धामणगाव बढे शिवारात जाधव नामक परिवाराची शेती आहे. आज गुरुवारी दुपारी मका पिकांवर औषधी फवारणीसाठी जाधव परिवारातील चौघे सदस्य शेतात आले होते. फवारण्यात येणारे औषध अति जहाल असल्याने आणि योग्य ती दक्षता न घेतल्याने या फवारणी मुळे दोन महिलांसह चौघा सदस्यांना विषबाधा झाली. काही मिनिटातच चौघे।अत्यावस्थ झाले .
हेही वाचा >>> पती दारू पिऊन द्यायचा त्रास, संतापलेल्या पत्नीने कोंबडी कापण्याची सुरी उचलली आणि…
याची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावकरी यांनी त्यांना उपचारासाठी नेण्याची व्यवस्था केली. त्यांना उपचारासाठी नेत असताना काही अंतरावरच दामोदर जाधव ( वय ६० वर्षे) यांचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. मोहन देवानंद जाधव, बेबी जाधव आणि सुभद्रा जाधव अशी बाधित व्यक्तींची नावे आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णलाय सूत्रांनी सांगितले. दरम्यान फवारणी औषध बाधित व्यक्तींच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आज संध्याकाळी जिल्हा सामान्य गाठले. यामुळे रुग्णालय परिसरात तोबा गर्दी उसळली. या धामधुमीत सर्पदंशाने गंभीर तिघा ग्रामस्थांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. यामध्ये दशरथ राठोड ( वय ६० वर्षे, राहणार गिरोली, तालुका मोताळा)लता अनिल वैराळकर ( वय ५० वर्षे, राहणार किन्होळा, तालुका मोताळा) आणि सीमा रवींद्र फासे (वय ३० वर्षे राहणार वरवंड तालुका बुलढाणा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना तातडीने भरती करण्यात आले आहे. शेतात काम करताना त्यांना सापाने दंश केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.