नागपूर : बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी बिबट्याच्या नसबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात यासंदर्भातील एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. आता वनमंत्री गणेश नाईक यांच्या कार्यकाळात देखील आणखी तोच प्रस्ताव केंद्राकडे परत पाठवण्यात आला. दरम्यान, प्रस्तावावर अजून केंद्राने निर्णय दिला नसला तरी बिबट्यांनी मात्र ऊसाचा मळा सोडलेला नाही. नुकतेच सातारा जिल्ह्यात ऊसाच्या मळ्यात खेळताना बिबट्यांची चारही पिले आईपासून दुरावली.
सातारा जिल्ह्यातील मौजे चचेगाव येथे बराबाहीची विहार या शिवारात बाबासो पवार यांच्या ऊसाच्या शेतामध्ये ऊस तोडताना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याची चार पिले आढळून आली. शेतकऱ्याने आणि ग्रामस्थांनी तातडीने वनखात्याला संपर्क केला. मादी बिबट्याचा आजूबाजूला शोध घेतला, पण ती आढळून आली नाही. त्यामुळे या चारही पिल्लांना वनविभागाने ताब्यात घेतले.
दरम्यान, मादी बिबट आक्रमक होऊ नये म्हणून त्यांचे पुनर्मीलन करण्याचा निर्णय घेण्यात वनविभागकडून घेण्यात आला. उपवनसंरक्षक सातारा आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक सातारा महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल मलकापूर आनंद जगताप, वनपाल कोळे बाबूराव कदम, वनरक्षक मलकापूर कैलास सानप, वनरक्षक शेणोली अक्षय पाटील, योगेश बडेकर, भरत पवार व वाईल्डहार्ट रेस्क्यूअर नाईटस् कराड अजय महाडिक, रोहित कुलकर्णी, गणेश काळे, सचिन मोहिते, रोहित पवार, विशाल साठे यांनी मादी बिबट व पिल्लांची भेट घडवण्यासाठी विशेष प्रकारे सेटअप लावला.
बुधवारी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी मादी येऊन पहिले पिल्लू घेऊन गेली तर दुसरे पिल्लू सात वाजून ३६ मिनिटांनी घेऊन गेली आहे. अजून काही वेळाने ती राहिलेली दोन पिल्ले मादी बिबट घेऊन गेली.दरम्यान, पुन्हा एकदा वनविभाग व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने बिबट्याच्या पिल्लांचे आईसोबत पुनर्मीलन करण्यात यश आले.
आतापर्यंत बिबट उसाच्या मळात आश्रय घेत होते, पण आता ऊसाच्या मळ्यातच मादी बिबट्यांनी पिल्लांना जन्म देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यामुळे उसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना उसाच्या मळ्यात जाणे कठीण झाले आहे.
© The Indian Express (P) Ltd