लोकसत्ता टीम
यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील विवाहाचा स्वागतसमारंभ आटोपून गावाकडे परत निघालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या वाहनाला झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणींसह चारजण ठार, तर १० जण जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास कळंब मार्गावरील वाटखेड गावाजवळ घडली. श्रृती गजानन भोयर (१२), परी गजानन भोयर (१३), लीलाबाई पातुरकर (४०) आणि नीलेश काफेकर (४२), अशी मृतांची नावे आहेत. सर्व मृत यवतमाळ शहरालगतच्या लोहारा गावातील आहेत.
यवतमाळच्या लोहारा परिसरातील राऊत यांच्या मुलीचे खैरी येथील अनिकेत ताजने याच्याशी २६ एप्रिल रोजी ढुमणापूर येथे लग्न पार पडले. या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ खैरी (ता. राळेगाव) येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यासाठी पाहुणे मंडळी एमएच ३७/बी-६८२३ क्रमांकाच्या स्कूलबसने खैरी येथे गेली होती. रात्री उशिरा ही मंडळी परत येत असताना राळेगाव-कळंब मार्गावरील वाटखेड गावाजवळ वाहनाचा टायर पंक्चर झाला. दुरुस्तीसाठी हे वाहन रस्त्याच्या बाजूला थांबल्यानंतर काहीजण वाहनाखाली उतरले, तर काही गाडीतच बसून होते. पंक्चर काढण्याचे काम सुरू असतानाच आयशर ट्रकने (एमएच-२६/एच-८४४४) स्कूल बसला जोरदार धडक दिली. रात्रीची वेळ असल्याने जखमींना मदत मिळण्यास उशीर झाला.
आणखी वाचा-अकोला : ४१.५० टक्के मातृशक्तीची मतदानाकडे पाठ; पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाचे प्रमाण कमीच
अपघातातील सर्व दहाही जखमींना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये माया धांदे, छकुली बंधरे, सोनू काफेकर, आर्यन काफेकर, रूणाल बुरांडे, कुणाल काफेकर, शालीनी बुरांडे, नीलेश काफेकर, अक्षय राऊत (सर्व रा. घोन्सी, ता. पांढरकवडा) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती राळेगाव येथील प्रवीण महाजन यांनी राळेगाव पोलिसांना कळविली. सचिन दरणे, शशिकांत धुमाळ, वसीम पठाण यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी ट्रकचालक गजानन हेने (रा.आर्णी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहेत. या दुर्घटनेमुळे दोन्ही लग्नघरी शोककळा पसरली आहे.