police Nagpur dance : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील पोलीस ठाण्याच्या आवारात ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलीस कर्मचारी आणि दोन महिला अंमलदार अशा चारही पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हे चारही कर्मचारी तहसील पोलीस ठाण्यातील आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटणकर पोलीस हवालदार अब्दुल गणी, पोलीस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५ ऑगस्ट रोजी तहसील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीते लाऊडस्पीकरवर वाजविण्यात आली. त्यावर कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता. मात्र त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला ‘छोरा गंगा किनारे वाला’ हे गाणे गायचे होते. त्याने गाणे गायला सुरुवात केली व आग्रहापोटी सहायक उपनिरीक्षक संजय पाटणकर, पोलीस हवालदार अब्दुल गणी, पोलीस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी यांनी नृत्य करण्यास सुरवात केली. त्याचा ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडीओ काढला. तो काही वेळातच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. पोलीसही माणूस आहेत, त्यांनाही स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे, असे म्हणून अनेकांनी तहसील पोलीस ठाण्यात झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषाचे स्वागत केले. मात्र काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक कार्यालतून निर्देश जारी करण्यात आले होते व गणवेशात नाचण्यावर निर्बंध टाकण्यात आले होते. याचे उल्लंघन केल्याची बाब वरिष्ठांकडून गंभीरतेने घेण्यात आली. मुख्यालयातून त्यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले. चौघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! २५ ऑगस्टच्या परीक्षेत कृषी सेवकांचा २५८ पदांच्या समावेशासंदर्भात महत्त्वाचा….

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

दरम्यान, या कारवाईनंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. चौघेही जण स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पुढाकार घेत सहभागी झाले होते. त्यांनी दोन देशभक्तीपर गीतेदेखील म्हटली होती. कार्यक्रम झाल्यावर थोडा ताणतणाव हलका करण्यासाठी गाणे गात नृत्य केले. मात्र त्यासंदर्भात निलंबनाची कारवाई करणे हा अन्यायच असल्याची अनेक कर्मचाऱ्यांची भावना आहे.

हेही वाचा – दोन बहिणींनी रेल्वेने भिलाई गाठले, आजीचा खून केला आणि…

‘वर्दीवर नृत्याचा ठेका धरणाऱ्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वर्दी घालून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तवणूक खपवून घेतल्या जाणार नाही. खाकी वर्दीची प्रतिमा मलीन होईल, असे कृत्य कुणीही करू नये अन्यथा कारवाई केल्या जाईल.’ – राहुल मदने (पोलीस उपायुक्त)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four police from nagpur who dance to song suspended video of police dancing to song khaike paan banaras wala viral adk 83 ssb