लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : रामेटकमधील पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. ते सर्व जण कालव्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र, चार विद्यार्थी वाहून गेले. त्या चारही विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला तर चार जण थोडक्यात बचावले. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी रामटेकमध्ये घडली. मनदीप पाटील (१७), मयंक मेश्राम (१४), अनंत साबारे (१३) आणि मयूर बागरे (१५) अशी मृतांची नावे आहेत. विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचा शोध अद्यापही सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकनजीक बोरी गाव (घोटी टोक) असून येथे इंदिरा गांधी उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय आहे. येथे पाचवी ते १२ वी पर्यंतची मुले शिकतात. त्या शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे. त्यात जवळपास ६० मुले राहतात. १४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शाळेला सुटी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला जाण्याचा बेत आखला.

आणखी वाचा-नक्षल चळवळीत वैवाहिक आयुष्य धोक्यात… दहा लाखांचे बक्षीस असलेल्या दाम्पत्याचे आत्मसमर्पण

दुपारी आठही विद्यार्थी फिरायला निघाले. ते साडेचार वाजता कालव्यावर पोहचले. तेथे पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे आठही जण कालव्यात उतरले. मयंक मेश्राम, अनंत साबारे आणि मयूर बागरे यांना पोहणे येत नसतानाही ते खोल पाण्यात गेले. मनदीपने त्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मयूरने मनदीपचा हात पकडला. चारही मित्र वाहून जात असल्याचे बघून उर्वरित चौघे लगेच पाण्याबाहेर निघाले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, जंगल असल्यामुळे मदतीसाठी कुणीही आले नाही.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध

घाबरलेली चारही मुले वसतिगृहात परत आली. त्यांनी अधीक्षकांना माहिती दिली. त्यांनी लगेच रामटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांना माहिती दिली. ते ताफ्यासह कालव्यावर पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांची मदत घेतली.

आणखी वाचा-गडचिरोलीत कोट्यवधींचा धान बोनस घोटाळा?… भूमिहीन व्यक्तींच्या खात्यावर…

चोवीस तासांत सहा मुलांचा बुडून मृत्यू

गेल्या चोवीस तासात पाण्यात बुडून सहा मुलांचा मृत्यू झाला. चार जणांचा पेंच कालव्यात तर दोघांचा मोहगाव झिल्पी तलावात बुडून मृत्यू झाला. फिरायला मोहगाव झिल्पी तलावावर गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वीरसेन विठोबा गजभिये (१५, रा. शिवसुंदरनगर, दिघोरी) आणि गौरव लीलाधर बुरडे(१५, रा. रमणा मारोती) अशी या मुलांची नावे आहेत. शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Story img Loader