यवतमाळ : यवतमाळ तालुक्यात तीन तर आर्णी तालुक्यात एक, अशा एकूण चार आत्महत्यांनी आज शुक्रवारी जिल्हा हादरला. दारव्हा मार्गावर असलेल्या दुचाकी शोरूमच्या व्यवस्थापकाने किन्ही शिवारात गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नीपासून विभक्त झालेल्या व्यक्तीने निळोणा धरणात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली, तर, मादणी बोरगाव शिवारात एका युवतीने गळफास लावल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडकीस आली आहे. आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील वृद्घाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
सुरेश गुलाबराव गावंडे (४८, रा. दत्तात्रयनगर, यवतमाळ), असे आत्महत्या करणार्या दुचाकी शोरूम व्यवस्थापकाचे नाव आहे. तो दारव्हा तालुक्यातील रहिवासी असून, मागील अनेक वर्षापासून दारव्हा मार्गावरील एका दुचाकी शोरूमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. किन्ही शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. व्यवस्थापकाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मादणी बोरगाव शिवारात युवतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून येताच त्याची माहिती ‘डायल ११२’वर देण्यात आली. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
आचल सुधीर डेहणीकर (१७, रा. येरडबाजार, ता. चांदूररेल्वे), असे मृत युवतीचे नाव आहे. ती कॉलेजला जात असल्याचे सांगून मंगळवारी घरून निघून गेली होती. मात्र, घरी परत न आल्याने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात मुलीला कुणीतरी पळवून नेल्याची तक्रार देण्यात आली होती. दरम्यान मादणी बोरगाव शिवारात तिचा मृतदेह आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कवरासे यांच्यासह पोलिस पथकाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. दोन्ही आत्महत्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवतीची आत्महत्या नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तर, पत्नीपासून विभक्त झालेल्या पतीने निळोणा धरणात उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. उदय बाबूराव काकडे (५०), असे मृताचे नाव आहे. दोन महिन्यापूर्वी व्यक्तीचा घटस्पोट झाला होता. गुरुवारी दुपारी घरून गेल्यावर रात्री परत आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. शुक्रवारी उदय काकडे याचा मृतदेह निळोणा धरणात आढळून आला. याप्रकरणी संयज बाबूराव काकडे, रा. चापमणवाडी, यवतमाळ) यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
हेही वाचा >>> विदर्भ राज्याची मागणी, सुरेश भटांची कविता, शरद पवारांच्या ‘ त्या’ भाषणाचा अर्थ काय?
आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे वृद्घाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. नुरसिंग रोडला चव्हाण (७०, रा. बोरगाव), असे मृताचे नाव आहे. बुधवारी दुपारी शेतात जात असल्याचे सांगून वृद्घव्यक्ती घरून गेले. उशिरापर्यंत परत न आल्याने नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. बोरगाव शिवारातील निंबाच्या झाडाखाली वृद्घ मृतावस्थेत आढळून आले. तर, काही अंतरावर विषारी औषधाची बॉटल होती. या प्ररकणी पवन देविदास चव्हाण याने आर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.