महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला देण्याची उदारवृत्ती महाराष्ट्र सरकारने दाखवली आणि दाखवत आहेत. पण आता हेच सरकार महाराष्ट्रातील वन्यप्राणी देखील गुजरातला पाठवण्याची उदारवृत्ती दाखवत आहेत. हत्तींपासून सुरु झालेला हा प्रवास आता वाघ आणि बिबट्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. गोरेवाडा प्रकल्पातील चार वाघ आणि चार बिबट कुणालाही कानोकान खबर लागू न देता शनिवारी रात्री गुजरातला रवाना करण्यात आले. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात हल्लेखोर असण्याच्या नावाखाली सुरू असलेली वाघ आणि बिबट्यांची धरपकड गुजरातसाठीच तर नाही ना, असा वास यायला लागला आहे.
काही दिवसांपूर्वी गोरेवाडा प्रकल्पातून दोन वाघ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी नेण्यात आले. मात्र, हे वाघ नेताना गुजरातमधील जामनगरमधील एका मोठ्या उद्योगपतीच्या खासगी प्राणीसंग्रहालयातील काही अधिकारी गोरेवाडा प्रकल्पात आले होते. ज्या वाघांची निवड झाली होती, ज्यावर केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केले होते, ते न नेता इतर वाघ नेण्यात आल्याचे गोरेवाडा प्रकल्पातील सूत्रांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी वाघ नेले जात असताना गुजरातच्या या खासगी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे अधिकारी तेथे काय करत होते, हाही प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला. आताही त्याच प्रकारची पुनरावृत्ती केली जात आहे.
हेही वाचा- राज्यातील ५२० हवालदार होणार पोलीस उपनिरीक्षक
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केलेल्या वाघ आणि बिबट्यांना न नेता इतर नेण्यात आले. या खासगी प्राणीसंग्रहालयासाठी प्रसिद्ध “साहेबराव” या वाघावर शिक्कामोर्तब प्राधिकरणाने केले होते. मात्र, “साहेबराव” ला नेण्यातच आले नाही. विशेष म्हणजे यादरम्यान केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची चर्चा आहे. एरवी लहानसहान घटनेचे प्रसिध्दीपत्रक काढणाऱ्या गोरेवाडा प्रशासनाने ही बाब प्रसारमाध्यमांपासून लपवून ठेवली. त्यामुळे उद्योगांपाठोपाठ महाराष्ट्रातील वन्यप्राणीदेखील गुजरातला पाठवण्याचा राज्यसरकारच्या या वृत्तीवर वन्यजीवप्रेमी सडकून टीका केली आहे.