गोंदिया:- रेल्वे प्रशासना मार्फत पायाभूत सुविधांच्या विकासा साठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काचेवानी ( तिरोडा) स्थानकावर असलेल्या लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ५१७ वर गर्डर टाकण्याचे काम शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी ब्लॉक घेऊन केले जाणार आहे. लेव्हल क्रॉसिंग वर गर्डर सुरू केल्याने, येत्या काही दिवसांत, रस्त्याच्या वापर कर्त्याला रेल्वेच्या कामकाजा दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेटवर थांबण्याची गरज भासणार नाही आणि यामुळे रेल्वेचे कामकाज देखील सुरक्षित आणि सुरळीत होईल.

या कामामुळे शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी गोंदिया स्थानकावरून जाणाऱ्या ४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या मध्ये दररोज धावणारी गोंदिया-इतवारी मेमू,  इतवारी – गोंदिया मेमू, व्हाया गोंदिया मार्गे धावणारी इतवारी-बालाघाट मेमू आणि  बालाघाट-इतवारी मेमूचा समावेश आहे. सदर ट्रेन नी गोंदिया,भंडारा, बालाघाट आणि अंशतः नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रेल्वेचे प्रवासी प्रवास करतात. या गाड्या इतवारी ते गोंदिया,बालाघाट जिल्हा पर्यंत येणाऱ्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर थांबत असल्यामुळे ग्रामीण रेल्वे प्रवाशां करिता या गाड्या जीवन वाहिनी ठरतात.उद्या शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी या रद्द करण्यात आले असल्यामुळे या जिल्ह्यातील ग्रामीण रेल्वे प्रवाशांना एक दिवसा करिता का होईना याचा त्रास होणार आहे.