लोकसत्ता टीम
वर्धा: वर्धा शहरातील मुख्य सोनार ओळीत मध्यरात्री एक इमारत खचली. त्यात सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र चार चाकी तसेच काही हातगाड्या त्यात दबल्याचे सांगण्यात येते. मध्यरात्री एक वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे.
ही दोन मजली इमारत बरीच जुनी आहे. तिचा अलीकडेच सौदा झाला होता. करंडे ज्वेलर्स यांनी ती खरेदी केल्याची माहिती आहे. जुन्या काळी या ठिकाणी ए वन टेलर्स हे प्रख्यात दुकान होते. ही इमारत कशी पडली, याविषयी उलटसुलट चर्चा सूरू आहे. पोलीस व वर्धा नगर परिषद प्रशासन घटनास्थळी पोहचले आहे.
या पडक्या दुमजली इमारतीबाबत न्यायालयात वाद सूरू असल्याचे समजले. या इमारतीस पालिका प्रशासनाने नोटीस बजावली होती. पण वाद झाल्याने प्रकरण कोर्टात गेले. इमारतीचे स्ट्रॅकचरल ऑडिट करीत तपासणी झाली. राहण्यास योग्य आणि अयोग्य असे वाद झाले.एकाने इमारत पडण्याची परवानगी मागितली. पालिका प्रशासनाने कोर्टात वाद असल्याने कोर्टास अर्ज करण्याचा सल्ला दिला. मात्र कोर्टाने परवानगी नाकारल्याची माहिती मिळाली. पालिका मुख्याधिकारी राजेश भगत यांनी या घडामोडी झाल्या असल्याचे सांगितले.
पण कोर्टाला बाजूस ठेवून इमारत ताब्यात घ्यायची व पाडायची, म्हणून तर इमारत पाडल्या गेली नाही ना ? असा संशय घटनास्थळी सूरू चर्चेत व्यक्त होत आहे. पालिका प्रशासन पण या अंगाने चौकशी करीत असल्याचे सांगण्यात आले. शहरात अनेक जीर्ण इमारती आहेत. त्या पडल्यास जीवित व अन्य स्वरूपात हानी होवू शकते म्हणून पालिका प्रशासनाने नोटीसा बजावल्या. या बहुतांश इमारतीच्या जागा सोन्याच्या किमतीच्या असल्याचे लपून नाही. म्हणून अश्या इमारतीबाबत कोर्टात व अन्य स्तरावर वाद सूरू आहेत. त्यातच आज पहाटे ही घटना घडल्याने उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे. सध्या पोलीस व पालिका प्रशासन या घटनेची चौकशी करीत आहे. त्यात खरे काय ते पुढे येईलच. इमारत पडल्याने काही वाहने क्षतीग्रस्त झाल्याचे दिसून येते.
रविवार हा येथील बाजाराचा दिवस असल्याने सकाळपासूनच परिसरात गर्दी आहे. इमारतीचा मलबा उचलून वाहतूक व झालेला खोळबा दूर करण्यास प्रशासन प्राधान्य देत आहे.