न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई
नागपूर : खोटय़ा शपथपत्राच्या आधारे बेघरांसाठी असलेली सदनिका बळकावल्याप्रकरणी भाजपचे चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर इमामवाडा व सक्करदरा पोलिसांनी ही कारवाई केली.
बंटी भांगडिया यांनी मार्च २००७ ते जून २००८ या कालावधीत खोटी शपथपत्रे सादर करून उंटखान्यातील नासुप्रच्या लोक गृहनिर्माण योजनेंतर्गत एबी ३०३ क्रमांकाचा गाळा घेतला. प्रत्यक्षात ही योजना बेघरांसाठी होती. भांगडिया यांनी गैरमार्गाने मालमत्ता घेत फसवणूक केल्याने इमामवाडा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर ५ एप्रिल २००७ ते १६ मार्च २००९ या कालावधीत भांगडिया यांनी अशाच प्रकारे खोटे शपथपत्र सादर करून स्वत: अथवा कुटुंबातील सदस्यांच्या नावे घर, गाळे अथवा भूखंड नसल्याचा दावा करीत आयुर्वेदिक लेआऊट येथील नासुप्रच्या घरकुल योजनेंतर्गत इमारत- डी मधील २०२ क्रमांकाचा गाळा घेतला. या प्रकरणात सक्करदरा पोलिसांनी भांगडिया यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत अॅड. तरुण चतुरभाई परमार यांनी तक्रार दिली होती.
तसेच परमार यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.