लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती: शासकीय नोकरीच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड करण्‍यात गाडगेनगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींनी शहरातील २८६ बेरोजगारांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

हर्षदा प्रदीप घोम (३७) रा. साईनगर व क्षीतिज राजेश आगरकर (२८) रा. धामणगाव रेल्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शहरातील अर्जुननगरातील रहिवासी विवेक सुरेंद्र नस्तिाने (२७) यांना या दोन्ही आरोपींनी तलाठी या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांची २ लाख ७० हजारांनी फसवणूक केली होती. या प्रकरणी विवेक नस्तिाने यांनी ४ मार्च रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. या प्रकरणात हर्षदा घोम हिला अटक करण्यात असून पाठोपाठ तिचा सहकारी क्षीतिज आगरकर यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. तपासात या दोन्ही आरोपींनी शहरातील २८६ बेरोजगारांना जिल्‍हा सामान्य रुग्णालय व मारुती सुझुकी कंपनी, बडनेरा येथे नियुक्ती देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची बाब तपासात समोर आली. दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेतल्यावर फसवणूक झालेल्या बेरोजगारांनी नोकरीसाठी दिलेले अर्ज, आधार कार्ड व फोटो आढळून आले आहेत. पोलीस दोन्ही आरोपींचे बँक खाते तपासून त्यांनी आणखी किती बेरोजगारांची फसवणूक केली, याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद साळोखे, मनीष सावरकर, ओम सावरकर, योगेश इंगोले, मंगला परिहार आदींनी केली.