चंद्रपूर: ताडोबात येणाऱ्या पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग केली. एजंटने सांगितल्यानुसार फोन-पेद्वारे पैसे पाठविले. पर्यटनासाठी आल्यानंतर प्रवेशद्वारावर दाखविलेले तिकीट बोगस असल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले. यामुळे ऑनलाईन बुकिंगमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार संबंधित पर्यटकाने दुर्गापूर पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी कलम ४२० भादंवी सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. केयुज कडुकर असे अटकेतील एजंटचे नाव आहे.

संभाजीनगर (औरंगाबाद) २७ श्रीनिकेतन कॉलनी येथील मनीष बावसकर (वय ५४) यांनी त्यांचे परिवार व नातेवाईकांच्या ताडोबा सफारीसाठी एजंट केयुज कडुकर (रा. चंद्रपूर) यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर कडुकर याच्या ९५१८९३९८७९ या मोबाईल क्रमांकाच्या फोनवर १८ लोकांचे जून २०२३ या महिन्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकींग केले. २५ मार्च २०२३ रोजी सफारी बुकींगच्या नावाखाली २५ हजार ५०० रुपये, २७ मार्च २०२३ रोजी ३ हजार रुपये, १४ एप्रिल रोजी १० हजार ४०० रुपये असे एकूण ३८ हजार ९०० रुपये फोन-पेद्वारे पाठविले. परंतु बावसकर हे कुटुबीय आणि नातेवाईकांसह ताडोबा पर्यटनाला येऊ शकले नाही. त्यामुळे बुकिंगची रकम एजंट केयुज कडुकर याच्याकडे जमा होती. त्यानंतर बावसकर यांनी कडुकर या एजंटशी संपर्क साधून ताडोबा सफारी बुकींगकरिता १८ नोव्हेंबर २०२३ रोजी गुगल-पेद्वारे ५ हजार रुपये पाठवून २७ जानेवारी २०२४ रोजीची ताडोबा सफारी बुकींग कन्फर्म केली. त्यानुसार २७ जानेवारीला मनीष बावसकर हे कुटुंबीय आणि नातेवाईकांसह ताडोबा सफारीकरिता मोहुर्ली गेट येथे पोहोचले. यावेळी बावसकर यांनी बुकींग केलेली तिकीट दाखविली असता तेथे उपस्थित कर्मचाऱ्याने तिकीट बोगस असल्याचे सांगितले. हा प्रकार बघून बावसकर यांना धक्का बसला. त्यानंतर तातडीने दुर्गापूर पोलीस ठाणे गाठून ऑनलाईनच्या नावाने फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल केली.

हेही वाचा – वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे निलंबन, वसतिगृह सोडण्याचे निर्देश

विशेष म्हणजे, एजंट केयुज कडुकर याने राकेशकुमार मोतीलाल वाजपेयी (वय ५८ वर्षे, रा. उदयगिरी अनुशक्तीनगर मुंबई) यांचे ६ जानेवारी २०२४ रोजी ताडोबा सफारीकरिता ४ ऑनलाईन तिकीट बुक केले. त्यांच्याकडून गुगल-पेद्वारे २२ हजार ५०० रुपये घेतले. यात राकेशकुमार वाजपेयी यांचीसुद्धा फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे दुर्गापूर पोलिसांनी कलम ४२० भादंवी सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० अन्वये गुन्हा दाखल करून एजंट केयुज कडूकर याला अटक केली.

हेही वाचा – नागपूर : दीडशेवर बुलेटचालकांना लावले ‘फटाके’

ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात दुर्गापूरच्या पोलीस निरीक्षक लता एस. वाडिवे, पोलीस उपनिरीक्षक गिरीष मोहतुरे, खुशाल खेडेकर, योगेश शार्दुल, योगराज काळसर्पे, प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव, मंगेश शेंडे, संपत पुलिपाका यांच्या पथकाने केली.

Story img Loader