लोकसत्ता टीम

नागपूर : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावावर सायबर गुन्हेगाराने एका तरुणाची १ लाख ४५ हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी पीडित रॉकी युवराज मारसिंगे (३१) रा. अंतुजीनगर, भांडेवाडीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

गेल्या ८ सप्टेंबरला रॉकी याला हर्षल मित्तल नावाच्या व्यक्तीचा फोन आला. हर्षलने शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला नफा होईल, असे आमिष दाखविले. त्यानंतर प्रविण शर्मा नावाच्या युवकाने रॉकीला शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत मॅसेज केला. मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी पडून रॉकी त्यांच्या जाळ्यात अडकला. तरीही खबरदारी म्हणून त्याने सुरुवातीला खूपच कमी रक्कम गुंतविली.

आणखी वाचा-ओबीसी आंदोलनकर्ते टोंगे यांची प्रकृती चिंताजनक, तातडीने रुग्णालयात हलविले

आरोपींनी त्यावर त्याला भरपूर नफा दिला. रॉकीचा त्यांच्यावर विश्वास बसला. आरोपींनी अधिक नफा पाहिजे असल्यास अधिक रक्कम गुंतविण्यास सांगितले. रॉकीने आरोपींच्या खात्यात १.४५ लाख रुपये जमा केले. पैसे खात्यात येताच सायबर गुन्हेगाराने त्याचा मोबाईल ब्लॉकमध्ये टाकला. त्याचे पैसेही परत केले नाही. आरोपींचे फोनही बंद झाले. फसवणूक झाल्याचे समजताच रॉकीने पोलिसात धाव घेतली. वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपींवर फसवणूक आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Story img Loader