नागपूर : कॅनडाला नोकरी लावून देण्याचे आमिष देवून पती-पत्नीची दहा लाख रुपयांनी फसवणूक केली. मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
फिर्यादी सदयया मंतूशेषना (३२) हे मुळचे केरळचे असून सध्या नागेश सोसायटी, मानकापूर येथे राहतात. कोराडी मार्गावरील एका खाजगी रुग्णालयात काम करतात. सदयया हे वॉर्डबॉय तर त्यांची पत्नी परिचारीका आहे. ते दोघेही बऱ्याच वर्षांपासून रुग्णसेवेत आहेत, विदेशात रुग्णसेवेला प्राधान्य असून चांगला पगार मिळत असल्याने त्यांना विदेशात नोकरी करायची होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन प्रयत्न केले. नोकरीची वेगवेगळी संकेतस्थळे शोधली. एका संकेतस्थळावर त्यांना विदेशात नोकरी असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी अर्ज केला. काही दिवसांत एका व्यक्तीकडून मेलव्दारे कागदपत्रांची मागणी झाली. कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर ‘व्हीजा’ व इतर खर्चासाठी तीन महिन्यांत १० लाख ६० हजार रुपये उकळले. मात्र, नोकरी काही मिळाली नाही.
हेही वाचा – चंद्रपूर : चिरीमिरीसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची वडेट्टीवारांकडून कानउघाडणी
हेही वाचा – चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरवर हल्ला
पैसे घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे सदयया यांच्या लक्षात आले. त्याने पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.