लोकसत्ता टीम
अमरावती: दुचाकी वाहन विक्रेत्याकडून उत्सव काऊंटर उघडण्याच्या नावाखाली १४ दुचाकी घेतल्यानंतर त्या दुचाकींची परस्पर विक्री करून एका वाहन व्यावसायिकाची १२ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दोघांविरूद्ध राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
येथील नवाथे चौकातील श्रेयस मोटर्समधून उत्सव काऊंटरच्या नावाखाली १४ दुचाकी परस्पर विकण्यात आल्या. या प्रकरणी श्रेयस मोटर्सचे सुरेश भांडारकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी स्नेहलकुमार वानखडे (३४, अशोक कॉलनी, अमरावती) आणि वैभव बगणे (२७, कठोरा रोड, अमरावती) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
आणखी वाचा-‘एनजीटी’कडून ‘एसीसी सिमेंट’ कारखान्याच्या चौकशीचे आदेश; अदानी समूहाचा कारखाना
आरोपींनी आधी भांडारकर यांचा विश्वास संपादन केला. उत्सव काऊंटर उघडून आपण तालुक्याच्या ठिकाणी वाहनांची विक्री करून देतो, असे आमिष आरोपींनी दाखवले. १३ ऑगस्ट २०२२ रोजी आरोपींनी धामणगाव रेल्वे येथे स्वरांश हिरो मोटर्स या नावाने उत्सव काउंटर उघडले. त्यावेळी त्यांनी भांडारकर यांच्याकडून हिरो कंपनीच्या १४ दुचाकी विक्री करण्यासाठी मिळवल्या. त्या दुचाकीच्या विक्रीबाबत भांडारकर यांना कुठलीही माहिती न देता आरोपींनी त्या परस्पर विकल्या. दुचाकींच्या विक्रीतून आलेली रक्कमही आरोपींनी भांडारकर यांना दिली नाही. ही रक्कम मिळवण्याचा प्रयत्न भांडारकर यांनी केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आज राजापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.