नागपूर : ‘क्रिप्टोकरन्सी’ गुंतवणुकीचे अमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या २० वर्षीय तरुणीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. तरुणीविरुद्ध दाखल आरोपपपत्र रद्द करण्यास उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. साक्षी राजेंद्र खोब्रागडे (रा. भाऊराव नगर) असे आरोपी तरुणीचे नाव आहे.

साक्षीने दामदुप्पट व्याजाचे आमिष देवून १९५ गुंतवणूकदारांची ४ कोटी २५ लाख ८० हजार ६३५ रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी साक्षीविरूध्द यशोधरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि नागपूर पोलीस आयुक्तांनी साक्षीविरूध्द ८ मार्च २०२२ रोजी कायदेशीर कारवाई करण्यासाठी मंजुरी दिली होती. ही कारवाई रद्द करण्याकरिता साक्षीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. साक्षीविरूध्द महाराष्ट्र नियंत्रित संघटित गुन्हेगारी कलम २३ (२) अंतर्गत कारवाई करण्याकरिता मंजुरी दिली होती. साक्षी ही नागपुरातील एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी. ई. पदवी अभ्यासक्रम शिक्षण घेत आहे. गुंतवणूकदारांच्या फसवणुकीप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी साक्षीविरूध्द भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, १२० (ब) व महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्टस ऑफ डिपॉझिटर्स कलम ३,४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी साक्षी अद्यापही फरार आहे. राज्य शासनानतर्फे अ‍ॅड. संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.

हेही वाचा >>>गडचिरोली : नक्षल-पोलीस चकमकीनंतर सीमा भागातील गावांमध्ये स्मशान शांतता, घटनास्थळावर शिजलेले अन्न, साहित्य व गोळ्यांचा खच

प्रकरण काय?

साक्षी आणि इतर आरोपींनी इथर ट्रेड एशिया नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून लोकांना क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सांगत होते. गुतंवणूक करण्यासाठी त्यांनी अनेक सेमिनार आयोजित केले. या सेमिनारच्या माध्यमातून ते क्रिप्टोकरन्सीचे फायदे लोकांना पटवून देत होते. सेमिनारमध्ये उपस्थित लोकांनी लोभामुळे कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र त्यांना परतावा मिळाला नाही. यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणात साक्षीसह अनेक आरोपींवर पोलिसानी गुन्हे दाखल केले आहेत.

‘क्रिप्टोकरन्सी’ म्हणजे काय?

आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता.

२००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या.अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही.