अमरावती : मूळच्‍या अमरावतीच्‍या आणि सध्‍या ऑस्‍ट्रेलियात वास्‍तव्‍यास असलेल्‍या एका महिलेच्‍या बँक खात्‍याचे डेबिट कार्ड प्राप्‍त करून त्‍याद्वारे त्‍यांची १० लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आल्‍याची घटना उघडकीस आली. या महिलेच्‍या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्‍या विरोधात सायबर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

या प्रकरणातील तक्रारकर्ती महिला ऑस्‍ट्रेलियात राहते. त्‍यांचे अमरावतीतील एका बँकेत खाते आहे. ते खाते अपडेट करण्‍यासाठी त्‍यांनी ऑस्‍ट्रेलियाहून ई-मेल करून काही महत्त्वाची कागदपत्रे पाठवली. त्‍यावेळी त्‍यांनी बँकेकडे डेबिट कार्डचीही मागणी केली. परंतु ते डेबिट कार्ड त्‍यांना मिळाले नाही. त्‍या पूर्वी पुणे येथे राहत होत्‍या, त्‍या पत्त्यावर डेबिट कार्ड गेले होते. अज्ञात व्‍यक्‍तीने ते स्‍वीकारले. दरम्‍यान १० जानेवारी ते १६ जून दरम्‍यान महिलेच्‍या बँक खात्‍यातून डेबिट कार्डद्वारे व काही रक्‍कम थेट वळविण्‍यात आली.

हेही वाचा – नवनीत राणांनी घेतली अजित पवारांची भेट; म्‍हणाल्‍या, ”राष्‍ट्रवादीचा पाठिंबा मिळत आला आहे”

हेही वाचा – यवतमाळ : जरांगे पाटील यांचे स्वागत चोरांच्या पथ्यावर पण…

आपल्‍या खात्‍यातून १० लाख ३८ हजार ९९ रुपये कुणीतरी वळवल्‍याचे समजताच या महिलेने याबाबत अमरावतीत राहणाऱ्या त्‍यांच्‍या वडिलांना माहिती दिली. त्‍यानंतर त्‍यांनी सायबर पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली. संपूर्ण आर्थिक व्‍यवहार महिलेच्‍या खात्‍यातून व डेबिट कार्डच्‍या माध्‍यमातून झाल्‍याने त्‍या महिलेला अमरावतीत बोलावून तक्रार नोंदवून घेण्‍यात आली. या प्रकरणी सायबर पोलीस तपास करीत आहेत.

Story img Loader