लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती: येथील एका डॉक्‍टरच्‍या मुलाला एमबीबीएस अभ्‍यासक्रमासाठी संस्‍थेच्‍या कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्‍या प्रकरणी आरोपीच्‍या विरोधात गाडगेनगर पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला आहे.

रोहन मधुकर भेंडे (रा. करजगाव, ता. चांदूरबाजार) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सध्‍या रायगड जिल्‍ह्यातील रोहा कोलाड येथे राहतो. येथील वैद्यकीय व्‍यावसायिक डॉ. जयप्रकाश बनकर यांचा मुलगा सांदिपान याला एमबीबीएस अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश हवा होता. डॉ. बनकर यांची गरज ओळखून एका महिलेच्‍या माध्‍यमातून आरोपी रोहन भेंडे याने त्‍यांच्‍याशी संपर्क साधला. नागपूर येथील लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयात आपली ओळख असून संस्‍थेच्‍या कोट्यातून एमबीबीएस अभ्‍यासक्रमामध्‍ये प्रवेश मिळवून देतो, असे आमिष आरोपी रोहन भेंडे याने दाखवले.

आणखी वाचा- कमी किमतीत वाहन खरेदी करण्याचे प्रलोभन, तब्बल ४५०० दुचाकी चालक अडकले सापळ्यात, कोट्यवधींची फसवणूक

१ ऑक्‍टोबर २०२२ रोजी याच महिलेच्‍या मध्‍यस्‍थीने डॉ. बनकर यांनी आरोपीला सर्वप्रथम २५ लाख रुपये रोख दिले. कॅम्‍प परिसरातील एनसीसी कॅन्टिनजवळील इमारतीत राहणाऱ्या त्‍या महिलेच्‍या घरी हा व्‍यवहार झाला. त्‍यानंतर ७ ऑक्‍टोबरला २ लाख रुपये, ९ ऑक्‍टोबर रोजी ४२.५० लाख रुपयांचा धनादेश कॅन्‍सल करून त्‍याच दिवशी ५७ लाख ५० हजार रुपये रोख, २ नोव्‍हेंबरला फॉर्म सबमिशनच्‍या नावावर २ लाख रुपये आणि १५ नोव्‍हेंबर २०२२ रोजी ४७ लाख रुपये, असे एकूण १ कोटी ३३ लाख ५० हजार रुपये डॉ. बनकर यांनी आरोपीला दिले.

एवढी मोठी रक्‍कम दिल्‍याने प्रवेश नक्‍की होईल, असे बनकर यांना वाटले, पण प्रवेशाची वेळ निघून जात असतानाही मुलाचा प्रवेश होत नसल्‍याचे पाहून डॉ. बनकर यांनी आरोपीसोबत अनेक वेळा संपर्क साधला. प्रवेश होत नसल्‍यास रक्‍कम परत करण्‍याची विनंती डॉ. बनकर यांनी आरोपीला केला. पण, आरोपीने उलट समाजात बदनामी करण्‍याची धमकी डॉ. बनकर यांना दिली.

आणखी वाचा- गडचिरोली: प्रस्तावित लोहखाणींवरून आदिवासींमध्ये असंतोष

दरम्‍यान, डॉ. बनकर यांनी पैशांसाठी तगादा लावल्‍यावर आरोपीने एका कंपनीच्‍या नावाचे दोन पोस्‍ट डेटेड चेक बनकर यांना दिले. डॉ. बनकर यांनी ते बँकेत वटविण्यासाठी दिल्‍यानंतर त्‍या धनादेशावरील सह्या बनावट असल्‍याचे बँकेने कळवले. तसेच त्‍या खात्‍यात पुरेशी रक्‍कमही नसल्‍याचे बँकेने स्‍पष्‍ट केले. त्‍यामुळे डॉ. बनकर यांनी पत्राद्वारे दुसरा धनादेश तसेच बँक खात्‍यात पुरेशी रक्‍कम ठेवण्‍याची विनंती केली. त्‍यावर आरोपीने डॉ. बनकर यांना धमकीचा व्हिडिओ पाठवला. अखेर डॉ. बनकर यांनी आरोपीच्‍या विरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud with doctor by pretending to get admission in mbbs mma 73 mrj
Show comments