लोकसत्ता टीम

भंडारा : आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील ३०० च्यावर कर्मचाऱ्यांकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाखों रुपये उकळल्याचा आरोप साकोली विधानसभा काँग्रेसचे प्रभारी डॉ. अजय तुमसरे यांनी केला आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कामगारांपैकी अनेकांनी या फसवणुकीबद्दल संताप आणि निराशा व्यक्त केली आहे.

ग्रामीण ते शहरी भागात आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या ठिकाणी आरोग्य कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. मात्र, २५ ते ३० वर्षे सेवा बजावूनही या कंत्राटी कामगारांना शासकीय लाभ आणि नोकरीच्या सुरक्षिततेपासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे. त्यातच आरोग्य विभागात कायमस्वरूपी पदे मिळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रति व्यक्ती ७५,००० ते एक लाख रुपये उकळल्याचा आरोप काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.

आणखी वाचा-नागपूर : उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी हास्यास्पद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “जेलमध्ये टाकू अशी… “

दहा वर्षांहून अधिक काळ काम केलेले आहे त्यांनाच कायमस्वरूपी केले जाईल असा आदेश सरकारने जारी करण्यापूर्वी ही रक्कम गोळा करण्यात आली होती असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. नऊ महिन्यांपूर्वी भरीव रक्कम भरूनही अनेक कामगारांना अद्यापही नियमित करण्यात आलेले नाही, त्यामुळे ते हताश आणि चिंतेत आहेत.

डॉ. तुमसरे यांनी केलेल्या आरोपांनुसार जिल्ह्यातील ३०० हून अधिक कामगारांकडून कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे, काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी दावा केला की त्यांनी ही देयके देण्यासाठी खाजगी सावकारांकडून उच्च व्याजदराने पैसे घेतले. आता, ते कर्जाची परतफेड आणि घरखर्चाचे व्यवस्थापन यांच्यात अडकले आहेत, मंत्री आणि सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने ही रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. सरकार भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे स्वप्न दाखवत असतानाच हा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यामुळे संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा-अपमानाचा वचपा हत्या करून काढला, बेपत्ता विद्यार्थिनीच्या हत्येचा उलगडा

एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी महाराष्ट्रातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांना देण्याच्या नावावर कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ७५ हजार रुपये वसूल करुन सुमारे १००० कोटींपेक्षा अधिक माया जमविली. या भ्रष्टाचार प्रकरणात सरकारने लक्ष घालून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवून संबधित संघटनेच्या पदाधिकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉ. अजय साकोली विधानसभा काँग्रेस प्रभारी तुमसरे यांनी केली.

Story img Loader