नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष, भीती दाखवून जबरीने गुंतवणुकीस भाग पाडून फसवणूक करणाऱ्या टोळीस प्रतापनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फिर्यादी साहिल विनोदसिंह चव्हाण (रा. बन्सीनगर) याने इन्स्टाग्रामवर विक्रांत एक्स्चेंज या होम पेजवर ‘गुंतवलेल्या रकमेवर तीन दिवसांत तीन टक्के व्याजदराने परतावा मिळेल’ अशी जाहिरात बघितली. त्याने स्वतः व मित्र शुभम काळबांडे यांनी रोख व ऑनलाइन रक्कम गुंतवली. ती परत मागितली असता विक्रांत एक्स्चेंज नावाने बोलणाऱ्याने ‘तुम फिरसे पैसा डालो. नही डालोगे तो तुम्हारे पुरे पैसे डुब जायेंगे’ अशी भीती दाखवल्याची तक्रार आल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विक्रांत एक्स्चेंज नावाने असलेल्या कंपनीच्या फोन कॉल्सवरून सांगितेलेले अकाउंट व इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. गायत्रीनगरातील एका फ्लॅटवर काहीजण एका उपकरणावर रक्कम मोजत होते. तेथे आरोपी अर्जुन चंदूभा राठोड व धर्मेंद्र अकोबा वाला, नीलेशकुमार मनुप्रसाद दवे, विष्णुभाई क्रिष्णादास पटेल (रा. क्वेटा कॉलनी वर्धमाननगर), विरमसिंह जयवंतसिंह राठोड (रा. सिमर ता. उना, जि. सोमनाथ), विक्रमसिंह धनाजी वाघेला, जोरुबा जेलुसी वाघेला (रा. वसाई, ता. चाणसमा, जि. पाटण) या आरोपींना पकडण्यात आले. तेथून ५८ लाख ३६ हजार ५२५ रुपये, रक्कम मोजण्याची २ उपकरणे, ६ मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. हे सर्व आरोपी गुजरातचे आहेत.