लोकसत्ता टीम
नागपूर: बँकेचा व्यवस्थापक असल्याचे सांगून सामान्य नागरिकांना फोन करायचा आणि त्यांच्याकडून बॅंक खात्याचा तपशील घेऊन त्यांचे बॅंक खाते रिकामे करायचे. हा प्रकार नित्याचा झाला आहे. पण आता फसवणूक करणाऱ्यांनी त्यांची कार्यपद्धती बदलली आहे. ते शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने फोन करून लुटण्याचे प्रकार सुरू आहेत.
पोलीस उपअधीक्षक म्हणून निवृत्त सुरेश भोयर यांना हा अनुभव आला. भोयर यांनी तो समाजमाध्यमावर शेअर केला. त्यानुसार त्यांचे फेसबूक खाते हॅक केले गेले. त्यावरून फेसबूक मित्रांना संबंधिताने संदेश पाठवले. आपण सीआरपीएफ जवान असल्याचे सांगून व बदली झाल्याने फर्निचर नाममात्र किंमतीत विकायचे आहे असे सांगितले. फर्निचरचे छायाचित्र पाठवतो. पैशाची मागणी करतो.
दरम्यान आपले फेसबुक खाते हॅक झाल्याचे भोयर यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच विविध समाज माध्यमांवर ही पोस्ट टाकून कुणीही पैशाचा व्यवहार करू नये, असे आवाहन केले. दरम्यान काही दिवसांपूर्वीही नागपूर ‘आरटीओ’मधीलही एका अधिकाऱ्यासोबत सारखाच प्रकार घडला होता, हे विशेष.