लोकसत्ता टीम
बुलढाणा: भोळ्याभाबड्या, हावऱ्या लोकांना फसविण्यासाठी नकली नोटांचा साठा व पूरक साहित्य घेऊन ते निघाले खरे, मात्र कुणाची ‘शिकार’ करण्यापूर्वीच ते स्वतःच पोलिसांची शिकार ठरले!…
मोजक्या असली चलनामध्ये नकली नोटाचा वापर करून गंडविल्याच्या घटना घडतात. अश्याच एका टोळीला खामगाव पोलिसांनी गजाआड केले. हे भामटे चारचाकीने जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-अकोला रस्त्यावरील टेंभुर्णा फाट्यावर ही कारवाई करण्यात आली.
आणखी वाचा-अमरावती विभागात रब्बीच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ; जाणून घ्या कारण…
यातील एकावर यापूर्वीच नकली नोटाप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचण्यात आला. दरम्यान, बनावट नंबर प्लेट लावलेले वाहन खामगाव-अकोला रस्त्यावरील टेंभुर्णा फाट्यावर आल्यानंतर झडती घेण्यात आली. यावेळी ५०० रुपयांच्या ८४९ , २०० रुपयांच्या दोन, १०० रुपयांच्या आठ, ५० रुपये किंमतीच्या दोन, २० रुपयांची एक तर १० रुपयांच्या ८ भारतीय चलनाच्या नोटा, सहा मोबाइल, (एमएच-१२, व्हीएफ-७७७५ क्रमांकाची) बनावट नंबर प्लेट असलेली चारचाकी असा एकूण १४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आणखी वाचा-बुलढाणा : ईदगाहवर लावला भगवा झेंडा, गुन्हा दाखल
‘चिल्ड्रेन बँकेच्या’ ६१ बंडलांवर खऱ्या नोटा चिकटवून फसवणुकीच्या उद्देशाने हे आरोपी निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच जेरबंद केले. प्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे (३४, रा. बर्डे प्लॉट, खामगाव), मयुर किशोर सिद्धपुरा (३४), विलास बाबुराव ठाकरे (३८) दोघे राहणार अभय नगर, खामगाव, लखन गोपाल बजाज (३३, रा. दंडेस्वामी मंदिराजवळ) यांना अटक करण्यात आली. कारवाईत भारतीय चलनातील खऱ्या, काही नकली तर मुलांच्या बँक लिहिलेल्या नोटांचे ६१ गठ्ठे आढळले. खालच्या आणि वरच्या भागावर प्रत्येकी एक खरी नोट चिकटवलेली आढळून आली.