वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नकारात्मक अभिप्राय असतानाही भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रात तीन दुचाकी रुग्णवाहिका (बाईक ॲम्बुलन्स) देण्यात आल्या. ही वाहने तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने चालवण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ती धूळखात पडली आहेत.नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते नाहीत. त्यामुळे गंभीर आजारी रुग्णांना किंवा गरोदर मातांना तातडीने उपचार मिळावा, यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत योजनेतून तीन दुचाकी रुग्णवाहिका विकत घेण्यात आल्या. लोकार्पण करतेवेळी प्रकल्प कार्यालयाकडून मोठा गाजावाजादेखील करण्यात आला होता. प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय स्तरावरच्या माध्यमांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आता या दुचाकी रुग्णवाहिका धूळखात पडल्या आहेत. ही वाहने चालवण्यासाठी तज्ज्ञ चालक व योग्य रस्ते नाहीत. हे कारण रुग्णालय प्रशासनाकडून पुढे करण्यात येत आहे. दुचाकी रुग्णवाहिका घेण्यासाठीची जेव्हा चाचपणी करण्यात आली, त्यावेळेस बऱ्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही वाहने उपयोगाची नाही. या बदल्यात एकच लहान चारचाकी रुग्णवाहिका घ्यावी, असे सुचवले होते. मात्र, त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तीन दुचाकी रुग्णवाहिका घेण्यात आल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा