लोकसत्ता टीम
नागपूर: महामेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. याकरिता मोबाइल ऍप आणि महाकार्ड सह अनेक पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहेत. आता यात भर घालत महामेट्रोने मोफत महाकार्डची योजना घोषित केली आहे.
१६ मे २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत नगपूरकरांना २०० रुपयांचे टॉप अप करत महाकार्ड मोफत मिळवता येईल. २०० रुपयांचे टॉप अप केल्यावर कार्ड खरेदीकरता कुठलीही रक्कम वेगळी देण्याची गरज नाही. कार्डमध्ये जमा २०० रूपये पूर्णपणे प्रवासासाठी वापरता येणार आहेत. पूर्वी महाकार्ड खरेदी करतांना १५० रुपये द्यावे लागत असे. परंतु पुढील १ महिन्याकरिता केवळ टॉप अप करत हे कार्ड मिळवता येईल.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही योजना राबवली जात आहे. कार्ड धारकांना मेट्रो तिकिटावर १० टक्के सूट दिली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सहकार्याने या कार्डचे संचालन करण्यात येत आहे.