लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : सावली तालुक्यातील खेडी गावातील शेताशिवारातील झुडपी जंगलात एक वाघ, वाघीण आणि दोन शावकांसह ४ वाघ फिरत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याबाबतीत सावली वनविभाग अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

खेडी गावाला लागून असलेल्या शिवमंदिराजवळ गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चार वाघ दिसल्याने नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. वाघांनी रानडुकराची शिकार केल्याचे दिसून आले. सदरची माहिती तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. क्षेत्रसहाय्यक कोडापे, वनरक्षक आखाडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सावलीचे ठाणेदार आशीष बोरकर हेसुद्धा पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

आणखी वाचा-शिटीसारखा आवाज करत घरात शिरला घोणस…

जंगली श्वापदाच्या अस्तित्वामुळे शेतीची कामे प्रभावित झाली असल्याने नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात आंदोलन केले. वन्यप्राण्यांचे दर्शन आणि मानवावर हल्ले होण्याच्या घटना वारंवार सावली तालुक्यात घडत आहेत. वाघ, बिबट्या, रानडुक्कर, लांडगे असे वन्य प्राणी सावली तालुक्यातील जंगलात सहज दिसतात. तालुक्यातील ९० टक्के कृषी क्षेत्र जंगलाने वेढलेले आहे. वाघांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने या भागात चार कॅमेरे बसवले आहेत. मात्र वन्य प्राण्यांच्या दहशतीपासून पूर्णपणे मुक्ती मिळावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. शेतीच्या कामांवर परिणाम होत असून शेतमजूर काम करण्यास नकार देत आहेत.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींच्या नुकसानभरपाईची रक्कम सरकारने वाढवली पण आमच्यावरील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची संख्या कमी करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही”, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free movement of four tigers in khedi farms terror among citizens rsj 74 mrj
Show comments