भंडारा शहरातील स्टेशन मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात आज सकाळी १० वाजता बिबट्या संचार करताना दिसून आला. यामुळे शहरात दहशत पसरली आहे.
सुरक्षा रक्षक विनायक शिवाजी देशमुख यांना त्यांच्या संरक्षण चौकीसमोरील गवतामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले. हा बिबट १२ ते १८ महिने वयाचा असल्याचा अंदाज आहे. शेजारील जुन्या दूध डेअरीच्या भिंतीवरही बिबट्याचे केस आढळून आले आहेत. याबाबत माहिती मिळताच जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा उप वनसंरक्षक राहुल गवई, भंडारा रेंजर विवेक राजूरकर, उड्डाण पथकाचे संजय मेंढे, भंडारा मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. वनविभागाने घटनास्थळी ‘ड्रोन’ व ‘ट्रॅप’ कँमेरांद्वारे शोधमोहीम सुरू केली आहे. घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी व वनविभागाने केले आहे.
यापूर्वी ११ ऑगस्ट रोजी शहरातील बीएसएनएल कार्यालय, गांधी चौक परिसरात बिबट असल्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर शहरात दहशतीचे वातावरण होते. त्यावेळी वनविभागाने ती अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता शहरात पुन्हा बिबट दिसल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
बिबट्याच्या पाऊलखुणा दिसल्याने शोध सुरू
गेल्यावेळी बिबट्याच्या संचाराचे पुरावे सापडले नव्हते. आज मात्र बिबट्याच्या पाऊलखुणा आणि दूध डेअरीच्या भिंतीवर केस आढळून आले आहेत. शिवाय, समाज माध्यमांवर सार्वत्रिक झालेल्या छायाचित्रांतील बिबट मोठा होता, मात्र हा बिबट अंदाजे १५ महिन्यांचा असण्याची शक्यता आहे. जवळच असलेल्या पडिक इमारतीत त्याचा शोध सुरू असल्याचे भंडारा वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भा. राजूरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.