नागपूर : १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेले व त्यासाठी एक वर्ष कारावास भोगलेले जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक डॉ. पुंडलिकराव गेडाम यांनी वयाचे शतक पूर्ण केले असले तरी त्यांची उमेद, उत्साह व स्मरणशक्ती अजूनही दांडगी आहे.
९ ऑगस्ट रोजी देशभर ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त डॉ. गेडाम यांनी आठवणींना उजाळा दिला. काटोल तालुक्यातील थातुरवाडा या लहानशा गावात पुंडलिकराव गेडाम यांचा १९२४ मध्ये जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यावर ते पुढील शिक्षणासाठी नागपुरात आले. पटवर्धन शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. तेथे त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संपर्क आला.
हेही वाचा – नागपूर: मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने केली वाहतूक कर्मचाऱ्याला मारहाण
गेडाम म्हणाले, मी तेव्हा १८ वर्षांचा होतो. तो स्वातंत्र्य लढ्याने झापटलेल्या पिढीचा काळ होता. त्यावेळी महात्मा गांधी यांनी इंग्रजाना ‘भारत छोडो’ दिला आणि संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचे अटक सत्र सुरू झाले. दुसऱ्या फळीतील नेते भूमिगत झाले. त्यामुळे उरले ते आमच्यासारखे तरुण. मग आम्हाला भूमिगत नेत्यांना संदेश पोहोचवणे, त्यांना डबे पोहोचवणे, पोस्टर लावणे, पत्रके वाटणे ही कामे देण्यात आली. सर्वत्र इंग्रजांविरुद्ध आंदोलने, मोर्चे काढले जात होते. अशाच एका आंदोलनात १२ ऑगस्ट १९४२ ला मी सहभागी झालो. ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या आणि पोलिसांनी बर्डीतील मोदी नंबर २ मधून मला अटक केली. एक वर्ष मध्यवर्ती कारागृहात कारावास भोगला. या काळात माझ्यासोबत अनेक दिग्गज काँग्रेस नेते होते. तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. पण शाळा व्यवस्थापनाने स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होणार नाही, असे लेखी मागितले. त्यामुळे पटवर्धन शाळा सोडली व बुटी वाड्यातील टिळक विद्यालयात प्रवेश घेतला. तेथून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढच्या शिक्षणासाठी सातारा येथे गेलो. तेथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली. दरम्यान, १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला व नंतर महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली. पण त्या काळात तरुणांवर गांधी विचाराचा प्रचंड पगडा होता.
हेही वाचा – महिलाराज! नवीन अमरावती रेल्वे स्थानक बनले भुसावळ विभागातील पहिले ‘पिंक स्टेशन’ !
गेडाम यांनी साताऱ्यातील आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यावर शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा सुरू केली. १९८४ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी वृद्धांसाठी काम करणे सुरू केले. स्वातंत्र्य लढ्यात सहभागाबद्दल राज्य शासनाने विविध पुरस्कार देऊन गौरवले. १९७५ मध्ये त्यांचा ताम्रपत्र देऊन शासनाने सन्मान केला. आजही ‘भारत छोडो’ आंदोलनाचे नाव घेतले तर ते त्याकाळातील सर्व पट समोर मांडतात.