अकोला : जुने शहर येथील हरिहरपेठ भागात पुन्हा एकदा क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात एक जण किरकोळ जखमी झाला. यावेळी विशिष्ट समुदाय मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. जुने शहर पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळ गाठून तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याच भागात सोमवारी दोन गटात मोठा वाद होऊन दगडफेक व जाळपोळ झाली होती.
अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने शहराच्या हरिहर पेठ भागात आज सायंकाळी पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. अतिशय क्षुल्लक कारणावरून हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला. या वादानंतर एका विशिष्ट समुदायाचे नागरिक रस्त्यावर उतरले होते. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस व दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात सध्या शांतता आहे.
हेही वाचा >>> मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून मेगा भरती! तब्बल १८१३ पदांसाठी संयुक्त परीक्षेची घोषणा
या भागात सोमवारी ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागल्यावरून मोठ्या वादात पर्यवसान झाले होते. या वादावरून गाडगे नगर व हमजा प्लॉट येथील दोन वेगवेगळ्या समाजातील मोठे गट आमने-सामने आले. वाद आणखी वाढल्याने दोन्ही बाजूने तुफान दगडफेक आणि संतप्त जमावाकडून एक ऑटो रिक्षा व दोन दुचाकीची जाळपोळ करण्यात आली होती. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली होती. त्यानंतर आज पुन्हा वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. आता परिसरामध्ये कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
हेही वाचा >>> बुलढाणा : महायुतीचे ठरले; महाविकास आघाडीमध्ये पेच! उमेदवारीचा तीढा…
किरकोळ वादाचा प्रसंग
हरिहर पेठ भागात आज सायंकाळी किरकोळ वादाचा प्रसंग घडला होता. वेळीच दखल घेऊन तो मिटवण्यात आला. परिसरात चोख बंदोबस्त तैनात असून शहरात शांतता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हारकर यांनी केले आहे.
आरोपींची धरपकड
जुने शहरातील हरिहर पेठ भागात सोमवारी झालेल्या दोन गटातील वाद व त्यानंतर दगडफेक, जाळपोळ प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या प्रकरणात जुने पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले. त्या गुन्ह्यांखाली १७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कसून चौकशी करण्यात येत असून पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहेत.