नागपूर : पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राला वारंवार समज देऊनही तो सुधरत नसल्यामुळे पतीने त्याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी सकाळी पाचपावली हद्दीत बाबा बुद्धनगर येथे घडली. आसिफ अमजद खान (३२, बुद्धनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दीक्षित भगवान जनबंधू (३८) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ खान आणि आरोपी दीक्षित हे बाबा बुद्धनगर येथे एकाच वस्तीत काही अंतरावर राहतात. आसिफ हा त्याच परिसरात असलेल्या नागपूर महापालिकेच्या शाळेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. दीक्षित हा मॅक्सीचालक आहे. दोघांची मैत्री होती. त्यामुळे आसिफचे दीक्षितच्या घरी येणे जाणे होते. त्याची नजर दीक्षितच्या पत्नीवर पडली. त्याने हळूहळू तिच्याशी संबंध वाढवत मैत्री केली. पती घरी नसताना तो आसिफ त्याच्या घरी येत होता. आसिफने वेगवेगळी आमिष दाखवून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गेल्या काही दोन वर्षांपासून आसिफचे दीक्षितच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. पती घरी नसताना तो महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. ही माहिती दीक्षितला समजताच तो संतप्त झाला. त्याने आसिफला समजून सांगत संबंध तोडण्याची विनंती केली. मात्र, त्याने अनैतिक संबंध तोडण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांत मागील एक वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, त्याच्या पत्नीने आसिफसोबत असलेले संबंध तोडून टाकले. त्यानंतर महिला भेटण्यास आणि शारीरिक संबंधास नकार देत असल्यामुळे आसिफ बदनामी करण्याची धमकी देत होता. तिच्यावर दबाव आणून तिला त्रास देत होता. तिला रस्त्यात अडवून तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. आसिफच्या त्रासाबद्दल तिने पतीला सांगितले.
त्यामुळे आसिफचा काटा काढण्याचे दीक्षितने ठरविले. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास दीक्षित हा आसिफच्या घरी गेला. ‘माझ्या पत्नीला तू त्रास का देतोस?’ अशी विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. दीक्षितने कटानुसार चाकूने आसिफवर हल्ला केला. त्यांतर त्याच्या डोक्यावर सिमेंटची विट मारली. गंभीर अवस्थेत त्याला शेजाऱ्यांनी मेयो रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आसिफचा खून केल्यानंतर दीक्षित हा स्वत: पाचपावली पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पोलिसांना खुनाची माहिती दिली. माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दीक्षित जनबंधू यास अटक केली.