चंद्रपूर: निवडणूक कुठलीही असो, दोन वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या मैत्रीचे पर्व या जिल्ह्यात अनेक वर्षापासून बघायला मिळत आहे. अवघ्या सहा महिन्याच्या अंतराने झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया व वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मैत्रीचे पर्व अनुभवायला मिळाले आहे. विशेष म्हणजे पुगलिया यांनी मुनगंटीवार यांच्यासाठी बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेची बैठक घेवून कामगारांना विकासाला म्हणजेच मुनगंटीवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचा सकारात्मक परिणाम मुनगंटीवार विजयी होण्यात झाला.

या जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात स्वपक्षातील नेत्यांना व उमेदवारांना मदत करण्याऐवजी भीन्न पक्षातील दोन नेत्यांनी एकमेकांना मदत केल्याची अनेक उदाहरण आहेत. तर एकाच पक्षातील नेत्यांनी एकमेकांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याची, एकाच पक्षातील नेत्यांचा आपसातील संघर्ष, वादविवाद, भांडणे बघितली आहे. मूल-सावली विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या पहिल्या आमदार शोभा फडणवीस यांचा राजकीय उदय अशाच दोन भिन्न विचारांच्या मैत्रीतून झाला. आता मुनगंटीवार यांनाही माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मैत्रीची मदत झाली. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुक २ लाख ६० हजारांच्या विक्रमी मताधिक्याने पराभूत होणारे मुनगंटीवार विधानसभेची निवडणूक २६ हजाराच्या मताधिक्याने जिंकले. विशेष म्हणजे मुनगंटीवार यांना लोकसभेत बल्लारपूर मतदार संघात केवळ ७३ हजार मते मिळाली. मात्र विधानसभेत मुनगंटीवारांना १ लाख ५ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली. कॉग्रेस नेते पुगलिया यांच्या मदतीमुळेच मुनगंटीवारांच्या मताधिक्क्यात वाढ झाली अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हे ही वाचा… एमपीएससीने दिली परीक्षा रखडण्याची कारणे, म्हणे मराठा आरक्षण…

लोकसभा निवडणुकीत पुगलियांनी विकासाचा मु्द्दा समोर करित मुनगंटीवार यांना सढळ हाताने मदत केली होती. मात्र लोकसभेत गणित काहीसे बिघडले. परंतु पुगलियांनी विधानसभेत सढळ हाताने मदत केली. बल्लारपुर येथे पेपर मिल कामगारांची भव्य सभा आयोजित केली होती. या सभेला पुगलिया व मुनगंटीवार यांच्यासह युवा नेते राहुल पगलिया तसेच बल्लारपूर पेपर मिल संघटनेचे सर्व पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. याच सभेत पुगलियांनी पून्हा एकदा विकासाला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीलाच म्हणजे मुनगंटीवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे पुगलियांनी इतक्या उघडपणे प्रथमच मुनगंटीवार यांना मदत केली.

हे ही वाचा… Maharashtra Assembly Election Result Live : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आज जाहीर होणार? राजकीय घडामोडींना वेग

मुनगंटीवार व पुगलिया यांच्या मैत्रीपर्वांची सुरूवात विजयाने झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार समर्थक संतोष रावत यांचा पराभव केला.