नागपूर : शहरातील तरुणीला चंद्रपूरच्या एका तरुणाने इंस्टाग्रामवर फॉलो केले आणि तिच्या प्रत्येक फोटोला लाईक्स करायला लागला. तिच्या रिल्सवर कमेंटही द्यायला लागला. त्यामुळे तरुणीनेही त्याला प्रतिसाद दिला. चॅटिंग केल्यानंतर दोघांची ओळख झाली. एकमेकांशी संपर्क झाला. नंतर तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. तिचे सलग एक वर्ष लैंगिक शोषण केले. लग्नासाठी दबाव टाकताच त्याने तरुणीपासून दुरावा केला. ही घटना प्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक केली आहे. वैभव नत्थू गजवे (२८) रा. प्रतापनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

वैभव हा मुळचा चंद्रपूरच्या वरोरा येथील रहिवासी आहे आणि नागपुरात एका खासगी संस्थेत काम करतो. पीडित २४ वर्षीय तरुणी रिया (काल्पनिक नाव) कामठी परिसरात राहते. जानेवारी २०२४ मध्ये इंस्टाग्रामवर तरुणीची वैभवशी ओळख झाली होती. दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. या दरम्यान आरोपीने रियाला आपल्या घरी भेटायला बोलावले. लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो सतत त्या तरुणीचे लैंगिक शोषण करीत होता. काही दिवसांपूर्वी रियाने लग्नासाठी दबाव टाकला असता वैभवने तिच्यापासून दुरावा केला. तरुणीने जाब विचारला असता वैभवने लग्नास स्पष्ट नकार दिला. तरुणीने प्रतापनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून आरोपी वैभवला अटक केली.

दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला

ज्याप्रमाणे वैभवने रियाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्याचप्रमाणे अन्य एका तरुणीलासुद्धा जाळ्यात ओढले. तिच्याशी मैत्री केली आणि तिलासुद्धा वैभवने लग्नाचे आमिष दाखवले. वैभवला रियासोबत लग्न न करता दुसऱ्या प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळेच तो रियाला टाळाटाळ करायला लागला होता, अशी माहिती समोर आली.

Story img Loader