लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : समाजमाध्यमावर मैत्री झालेल्या तरुणाने कामाचे आमिष दाखवल्याने दिल्ली येथील २६ वर्षीय तरुणीने अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर गाठले. काम तर मिळालेच नाही, मात्र तरुणीला आपला जीव गमवावा लागला. तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या घटनेनंतर तरुण फरार झाल्याने त्यानेच हत्या केल्याचा प्राथमिक कयास व्यक्त केला जात आहे. शांतीक्रिया प्रशांत कश्यप (२६) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून कुणाल उर्फ सनी शृंगारे असे फरार तरुणाचे नाव आहे.

शांतीक्रिया कश्यप मूळची आसाम राज्यातील रहिवाशी होती. ती तिच्या आईसोबत अनेक वर्षापासून दिल्ली शहरात राहत होती. तिला टॅटू काढण्याची कला अवगत होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तिची ओळख यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथल्या कुणाल उर्फ सनी शृंगारे या तरुणासोबत समाजमाध्यमावर झाली. दोघांमध्ये संवाद होत असल्याने विश्वास वाढला. कुणालने शांतीक्रियाला काम देतो म्हणून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर शहरात बोलावले. त्याच्यावर संपूर्ण विश्वास टाकून शांतीक्रिया २१ जुलै रोजी मूर्तिजापुर शहरात आली. कुणाल या अगोदर काम करीत असलेल्या एका वाईन बारमध्ये देखील काम मागण्यासाठी गेला होता. मात्र, बार मालकाने काम देण्यास नकार दिला. शहरातील प्रतिक नगर येथील शुभम महाजन आणि मनोज व्यास यांच्या जागेतील खोली घेऊन दोघेही एकत्र राहू लागले.

आणखी वाचा-यवतमाळ जिल्ह्यात पाऊस मुक्कामी! २५ मंडळांत अतिवृष्टी; खुनी नदीला पूर

दोन दिवस व्यवस्थित गेलेत, मात्र कुणालला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत दोघांमध्येही वाद झाला. रागाच्या भरात कुणालने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. घरमालक शुभम महाजन यांना खोलीत शांतिक्रियाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ मूर्तिजापूर शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्येच्या घटनेपासून कुणाल फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कुणालचा शोध घेण्यासाठी स्थानिक शाखेसह पोलिसांचे विविध पथक रवाना झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, समाजमाध्यमावरील मैत्री तरुणीच्या जीवावरच बेतली आहे. समाजमाध्यमावर मैत्री झालेल्या तरुणावर विश्वास ठेऊन तरुणीने शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून दिल्लीवरून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर गाठले. मात्र, या ठिकाणी तरुणीला काम तर मिळाले नाहीच, शिवाय धोकाधाडी होऊन जीव गमवावा लागला. समाजमाध्यमावरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship on social media delhi girl killed in murtijapur ppd 88 mrj