वर्धा : एखादा छंद मोठा व्यवसाय स्थापन करण्यास कारणीभूत ठरल्याचे उदाहरण विरळाच. मात्र येथील एका कुटुंबाचा छंद त्यांची विदेशात कीर्ती करीत आहे. शशांक दिगंबर खांडरे हे वडील व भावासोबत मिळून स्नेहल किसान नर्सरी हिंगणघाटजवळील गावात चालवितात. सुरुवातीस ५ हजार वर्गफुटात सुरू झालेला हा व्यवसाय आता ५५ व ७२ एकर अश्या दोन परिसरात चालतो. दिगंबर खांडरे यांनी वन विभागाची नोकरी सोडून झाडांचा छंद पुढे नेला. विविध प्रकारची वृक्ष प्रजाती शोधून इथे नर्सरी फुलविली.

२००४ पासून व्यवसाय बहरला.दूरवर ख्याती पसरली. देशातून काही राज्यांनी मागणी केली. पुढे ब्राझील व मलेशिया येथे रोपटी पुरविली. ब्राझील येथील वाळवंटी भागात जिथे गवत पण उगवत नाही तिथे सरकारने बांबू व वडिलिया हे वाण येथून मागविले. चर्चा होत गेली. मागणी वाढत गेली आणि मालदीव येथील एक आर्किटेक्ट आपली चमू घेऊन इथे पोहचला. मालदीव येथे समुद्राकाठी त्याचे रिसॉर्ट असून ते हिरवेगार करायचे म्हणून २० हजार रोपटी घेऊन गेला. त्यात एकालिका, टरमिला, वॉशिंगटन पाम, कडुलिंब,डुरंटा व अन्य झाडांची प्रजाती त्यात आहे. विदेशात रोपटी पाठवितांना एक काळजी घ्यावी लागते. भारतातील माती तिकडे नेता येत नसल्याने कोकोबार म्हणजे नारळ सालीचा चुऱ्यात ते गुंडाळून न्यावे लागते. देशात प्रामुख्याने कोलकता, बंगळूरू, तामिळनाडू येथे नर्सरी व्यवसाय जोरात चालतो. पान आज त्याची बरोबरी करीत खांडरे परिवार पुढे निघाला आहे.

हेही वाचा…राज्यातील निर्भया पथक कागदावरच!

नियमित १५ व्यक्ती तर ३००वर हंगामी मजूर येथे कामावर असतात. कृषी पदवीधर असलेली दोन मुले मार्केटिंग व व्यवस्थापन सांभाळतात. इथल्या मातीत रुजणारी झाडे हजारो किलोमीटर अंतरावर आपले नाव राखणार, ही भावना ठेवणारे खांडरे कुटुंब अपत्यासारखा जिव्हाळा या रोपट्याना लावतात. खांडरे सांगतात जेव्हा वन खात्याची नौकरी सोडली तेव्हा पुढे काय करणार असा प्रश्न व केवळ रोपटी विकून संसाराचा गाडा कसा चालविणार, अशी सर्वांना शंका होती. पण आवड असलेली कला मेहनत घेऊन वाढविल्यास चार पैसे देवू शकेल, असा विश्वास होता. आज आमचेच कुटुंब नव्हे तर अनेक कुटुंबाच्या घरची चूल हीच रोपटी पेटवित आहे. १९९२ पासून सुरुवात तर पुढे २००४ पासून आजपर्यंत व्यवसाय म्हणून काम करीत आहोत. कधीच निराशा आली नाही, अशी भावना खांडरे व्यक्त करतात.

Story img Loader