नागपूर : राज्यात १ जानेवारी ते १४ ऑक्टोबर दरम्यान मागील दोन वर्षांची तुलना केल्यास यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत किंचित वाढ आहे. परंतु आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. दिवाळीच्या तोंडावर आरोग्य विभागाच्या अहवालातून हा प्रकार पुढे आला असून राज्यातील कोणत्या भागात किती रुग्ण, हे आपण बघू या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात १ जानेवारी २०२३ ते १४ ऑक्टोबर २०२३ मध्ये डेंग्यूचे १४ हजार २५१ रुग्ण आढळले होते. त्यापैकी उपचारादरम्यान ६ रुग्णांचा मृत्यू झाला. यावेळी प्रत्येक २ हजार ३७५ रुग्णांमध्ये एकाचा मृत्यू नोंदवला गेला. तर १ जानेवारी २०२४ ते १४ ऑक्टोबर २०२४ दरम्यानच्या काळात राज्यात डेंग्यूचे १५ हजार ५९ रुग्ण आढळले. त्यापैकी २१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या काळात ७१७ रुग्णांमध्ये एकाचा मृत्यू नोंदवला जात आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी राज्यात डेंग्यूचे मृत्यू वाढलेले दिसत असल्याचे आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, महाराष्ट्र राज्याच्या अहवालातून पुढे आले आहे. या वृत्ताला आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

हे ही वाचा…“भाजपमध्ये गडकरी समर्थकांना, डावलले जाते ” माजी आमदाराचा गंभीर आरोप

सर्वाधिक रुग्ण बृहन्मुंबईत

राज्यात १ जानेवारी ते १४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात (३,९२७ रुग्ण) आढळले. त्यानंतर महापालिका क्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये १ हजार ५७ रुग्ण, कोल्हापुरात ४४१, पुणे महापालिकेत ३२४, कल्याणमध्ये ३१४, पनवेलमध्ये ३०३, अमरावतीमध्ये २८८, लातूरमध्ये २२५, सांगली-मिरजमध्ये २१२, ठाणेमध्ये १७३, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३६ रुग्ण आढळले. तर राज्यातील ग्रामीण भागातील कोल्हापूरला ६४९, पालघर येथे ४८६, सातारात ४६८, नागपुरात ४०२, चंद्रपूरला ३६३, रायगडला ३४८, अमरावतीला २९८, गडचिरोलीत १६६, ठाणेमध्ये १५४, वर्धेत ११९, छत्रपती संभाजीनगरला ३२ रुग्ण आढळले.

हे ही वाचा…‘आनंदाचा शिधा’ आता फोटोविना; शिधापत्रिकाधारकांना…

डेंग्यूचे रुग्ण वाढण्याचे कारण काय?

राज्यातील अनेक भागात यंदाच्या वर्षी सातत्याने पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र डासांची संख्या वाढल्याने डेंग्यू, चिकनगुनियासह इतरही किटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहे. दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागासह विविध महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागाने सर्वत्र किटकनाशक फवारणीसह इतरही उपाय केले. त्यामुळे अनेक भागात हा आजार नियंत्रणात असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. परंतु नागरिकांकडून मात्र नागपूरसह बऱ्याच भागात रुग्ण संख्या जास्त असल्याचा आरोप होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From january 1 to october 14 dengue cases increased slightly but death rate is alarming mnb 82 sud 02