नागपूर: विधान परिषद निवडणुकीवरून सध्या राज्यातले राजकारण तापले आहे. नाशिकमध्ये काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. आता नागपूरमध्ये नाट्यमय घडामोडी होऊन ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे माघार घेतली आहे. निवडणुकीसाठी आम्ही दोन वर्षांपासून तयारी करत असून आमचा विजय निश्चित होता. मात्र पक्षाच्या आदेशामुळे वेळेवर माघार घ्यावी लागली असे नाकाडे म्हणाले.
हेही वाचा >>> ‘समृद्धी’ महामार्ग उठला नागपूरकरांच्या जीवावर!, अठरा दिवसांत आणखी दोघांचा मृत्यू
महाविकास आघाडीच्या जागा वाटपानुसार नागपूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली. गंगाधर नाकाडे यांनी अर्ज भरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांची शनिवारी मुंबईत बैठक झाली. पूर्ण ताकदीने प्रचाराला लागण्याचा निर्धार करण्यात आला. येत्या २१ जानेवारी रोजी आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक नागपुरात निश्चित करण्यात आली. सोमवारी दुपारपर्यंत तेच कायम राहतील, असे सांगण्यात आले. सेना नेते खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या सभांचे नियोजन केले जात असताना सोमवारी दोन वाजताच्या सुमारास नाकाडे यांना शिक्षक सेनेचे ज. मो. अभ्यंकर यांचा माघार घेण्याचा फोन आला. अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली. अर्थात नाकाडे यांनाही थोडी कल्पना आली होती. त्यामुळे जगनाडे चौकातील कॉलेजमधून ते कारने सिव्हिल लाईन्समधील विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचले. अर्ज मागे घेण्यासाठी तेव्हा ७ मिनिटे शिल्लक होती. अखेर त्यांनी अर्ज मागे घेतला. मात्र आपला विजय निश्चित असतानाही अर्ज मागे घेतल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज झाल्याचे नाकाडे म्हणाले.