नागपूर : पुण्यातील फिल्म ॲण्ड टेलिव्हजन इस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते गजेंद्र चौहान हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेकदा जवळीक साधून असतात. यापूर्वी त्यांनी एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. यानंतर चौव्हान यांनी नागपूर नागपूर चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरला आले असता मोठे राजकीय विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेक तर्क लावले जात आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र आता भविष्यात
महाराष्ट्र ही कलेची भूमी असून अनेकांना याच भूमीने कलाक्षेत्रात मोठे केले आहे. महाराष्ट्राच्या भूमिचा स्पर्श झाल्याशिवाय कोणताही कलाकार मोठा होऊ शकला नाही. देशातील महान कलाकारांना याच महाराष्ट्राच्या भूमिने मोठे केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेता गजेंद्र चौहान यांनी काढले. चौहान पुढे बोलताना म्हणाले, कलेला आकार देणारा कलाकार असतो. कलेची भूक ही स्वावलंबनाकडे नेणारी आहे. कला क्षेत्रात यशस्वी होत असताना अडचणी येतात. मात्र, संघर्षाशिवाय या क्षेत्रात यश प्राप्त होत नाही. कलाकारास कलेच्या जीवनात यशस्वी झाल्यानंतरच संतुष्टी मिळते, असे चौहान म्हणाले. आपल्या कामाने कुणाला त्रास होऊ नये. असा संयम आवश्यक आहे. यश मिळेल यावर आपला विश्वास असावा. भूक कायम ठेवा. भूक यशस्वीतेकडे नेईल, असे सांगत नागपूर शहराने देखील प्रगतीच्या दिशेने नवीन पाऊल टाकले आहे. पहिल्याच महोत्सवात ३५० पेक्षा अधिक चित्रपट सहभागी होणे अद्भुत असल्याचे चौहान म्हणाले. नागपूरने आतापर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिले. भविष्यात नागपूर देशाला पंतप्रधान देईल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याने अनेक राजकीय अर्थ लावले जात आहे.
हेही वाचा : नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
चित्रपट निर्मिती गंभीर व्यवसाय – योगेश सोमन
चित्रपट बनविणे हा गंभीर व्यवसाय आहे. किती पैसे लावले आणि किती निघाले यावर नव्हे तर समाजापुढे कोणता आदर्श ठेवला, यावर चित्रपटाची यशस्विता अवलंबून असल्याचे योगेश सोमन यांनी सांगितले. चित्रपटाचे लिखाण करताना पात्र काय बोलतात, शब्द कसे मांडले जातात, दृश्य कसे दाखविले जातात या बाबींवर लक्ष ठेवावे लागते. दृकश्राव्य माध्यम समाजावर परिणाम करतात, त्यामुळे आपणास जबाबदारीने चित्रपट निर्मिती करावी लागेल असे सोमन म्हणाले.