लोकसत्ता टीम
बुलढाणा : तिघांचे बळी घेणाऱ्या व अपघातानंतर फरार झालेल्या चालकास नांदुरा पोलिसांनी अटक केली. घटनेच्या तिसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली. संदीप विश्वनाथ पवार (रा. डिग्रस खुर्द, ता. पातुर, जि. अकोला ) असे आरोपी चालकाचे नाव आहे. वडनेर (भोलजी) पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस नायक विक्रमसिंह राजपूत यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आणखी वाचा-यवतमाळमध्ये शिवसैनिकाची चाकूने भोसकून हत्या; तणावाचे वातावरण
आरोपीने १४ नोव्हेंबरला आपल्या ताब्यातील खासगी बस भरधाव व चुकीच्या बाजूने चालवून दुचाकीला धडक दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ वरील वडनेर (भोलजी) नजीकच्या हॉटेल विश्वगंगा जवळ ही दुर्घटना घडली होती. अपघातात गोपाल शालीक राणे, स्वप्नील करणकार (जळगाव खान्देश), आकाश राजु आखाडे ( कल्याण) यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर चालकाने पोबारा केला. दरम्यान, १६ नोव्हेंबर रोजी चालक संदीप पवार याला नांदुरा पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भादंवीच्या कलम २७९, ३०४ (अ), मोटर वाहन कायद्याच्या कलम११९/१७७, १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले व हवालदार उमेश भारसाकळे करीत आहेत.