नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या १०८ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या तयारीसाठी ‘इस्का’च्या चमूने विद्यापीठातील पायाभूत सुविधा, कार्यक्रमाचे स्थळ, चर्चासत्रांचे सभागृह आदी सुविधांची पाहणी केली. यावेळी अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये ही परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तर विविध चर्चासत्रांसाठी गणित, जनसंवाद व औषधनिर्माणशास्त्र विभातील सभागृहांची निवड करण्यात आली. विद्यापीठामध्ये असलेल्या सुविधांवर समिती सकारात्मक असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व सुविधांची पाहणी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरामध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेवर परिषदेचा उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार आहे. तर शैक्षणिक परिसरातील गणित विभाग, जनसंवाद विभाग व अन्य विभागांमध्ये असणाऱ्या अद्ययावत सभागृहांमध्ये विज्ञान विषयावरील चर्चासत्र घेण्याचा निर्णय झाला. याशिवाय या परिषदेला देश, विदेशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही आमदार निवास व काही विशेष अतिथींची सुविधा ही पंचातारांकित हॉटेलमध्ये केली जाणार असल्याची माहिती आहे.
‘इंडियन सायन्स काँग्रेस’ हा देशातील सर्वात मोठा वैज्ञानिक सोहळा आहे. या परिषदेच्या तयारीसाठी ‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’ने (इस्का) अध्यक्ष डॉ. विजया लक्ष्मी सक्सेना आणि माजी अध्यक्ष डॉ. अशोक कुमार सक्सेना, महासचिव डॉ. रामक्रिष्णा, माजी सचिव डॉ. गंगाधर यांनी सोमवारी सकाळपासूनच विद्यापीठात अनेक सभा घेतल्या व प्रत्येक विभागाची पाहणी केली. .
२० कोटींची गरज
‘इंडियन सायन्स काँग्रेस’साठी जवळपास वीस कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून निधी गोळा करण्यात येणार आहे.