अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न उद्ध्वस्त झाले. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानावर शासनाकडून मदतीची फुंकर देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चार कोटी ४९ लाख ८५ हजारांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तीन हजार ६५१ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येईल.
जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात ६ ते ७ मार्चदरम्यान, बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर तालुक्यात १५ ते १९ मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. अवकाळीच्या फटक्यामुळे तीन तालुक्यातील तीन हजार ६५१ शेतकऱ्यांचे दोन हजार ५९३ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. गहू, कांदा, टरबूज, पपई, भाजीपाला, लिंबू आदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. या नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. १० एप्रिल रोजीच्या शासन निर्णयानुसार ६ ते १९ मार्चदरम्यान अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झालेल्या तेल्हारा, बार्शीटाकळी व पातूर तालुक्यांतील तीन हजार ६५१ शेतकऱ्यांसाठी चार कोटी ४९ लाख ८५ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. शासनामार्फत ‘डीबीटी’द्वारे मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. संबंधित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत.
हेही वाचा >>>अकोला: ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण…
दरम्यान, नुकत्याच ७ आणि ९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात चार हजार ७६७ शेतकऱ्यांचे पाच हजार ५१३ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. पीक नुकसानाचे पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे काम केले जात आहे. ३१ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर तालुक्यांत ६३५ शेतकऱ्यांचे ४३० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. मदतीसाठी ७८ लाख ४० हजाराच्या मदतनिधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे सादर केला. आता त्या मदतीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.