नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून निधी संकलित करण्यात आला आहे. यातून खरेदी करण्यात येणाऱ्या ५० हजार ध्वजांचे वाटप शाळांमधून केले जात आहे.
जिल्ह्यातील पदाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत ऐच्छिक स्वरूपात निधी संकलन करण्यात आले. या निधीतून ५० हजार तिरंगा ध्वज खरेदी करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत ध्वज वाटप करण्यात येणार आहेत. शाळामध्ये एकाच घरातील दोन मुले असतील तर त्यांना एकच ध्वज दिला जाईल. यानंतर शिल्लक ध्वज गावातील आर्थिक दुर्बल नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत वाटप करण्यात येणार आहेत. या मोहिमेत प्रत्येक घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थाच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियोजन आहे.
ध्वज संहिता पाळण्याचे आवाहन
ध्वज फडकवताना संहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत ध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर.यांनी केले.