चंद्रपूर: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या दमदार पाठपुराव्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील उपकेंद्रासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. आमदार श्री. मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या चर्चेवर उत्तर देताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठासाठी ४१४ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी जाहीर केला.

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थापन करण्याच्या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी विधानसभेत चर्चा उपस्थित केली. आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘३० मार्च २००७ ला गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीचा ठराव मांडला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर २०११ मध्ये गडचिरोली येथे विद्यापीठाच्या निर्मीतीचा मार्ग मोकळा झाला. त्याच्या काही वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.’

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १ जून २०२३ अन्वये विद्यापीठाचे उपकेंद्र  स्थापन करण्याच्या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठाला मान्यता दिली. या उपकेंद्रासाठी ८.५ एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेण्यात आली. विद्यापीठाला जमीन देण्याची तातडीने व्यवस्था केली. ३० मे २०२४ ला व्यवस्थापन परिषद आणि इमारत बांधकाम समितीनेही मान्यता प्रदान केली,’ अशी माहिती आ. मुनगंटीवार यांनी सभागृहाला दिली.

विद्यापीठाच्या उपकेंद्रासंदर्भात पाठविलेल्या प्रस्तावाविषयी आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘४१४ कोटी ७४ लाख रुपयांचा उपकेंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव सादर केल्यानंतर आतापर्यंत प्रशासकीय मान्यता आणि निधी मिळालेला नाही.’ आज पुन्हा एकदा उपकेंद्राचा प्रस्ताव मांडताना शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.

निधी मंजूर करण्याची घोषणा

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘गोंडवाना विद्यापीठाचे चंद्रपूर जिल्ह्यातील उपकेंद्र होणार आहे. त्यासाठी लागणारा निधी जुलैमध्ये पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केला जाणार आहे. यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाला स्वनिधीतून खर्च करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.’ आ. मुनगंटीवार यांनी केलेली मागणी अगदी योग्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला या विद्यापीठाच्या उपकेंद्रामुळे नवी दिशा मिळणार आहे, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Story img Loader