लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : रस्त्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करून दहन केल्याप्रकरणी धोडप ( तालुका चिखली) येथील ३५ गावकऱ्यांविरुद्ध अमडापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गावात पुन्हा खळबळ उडाली आहे. स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता लोखंडी गेट उभारून अडविल्याने धोडप येथील श्रीराम कोल्हे यांच्या पार्थिवावर १८ मार्च रोजी संध्याकाळी नातेवाईक व गावकऱ्यांनी रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले होते.

तालुक्यातील धोडप येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमिकडे नेण्यात आली असता डॉ. गणेश कोल्हे यांनी स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी गेट उभारल्याने अडथळा निर्माण झाला. पार्थिव तेथेच ठेवण्यात आले.अमडापूरचे ठाणेदार सचिन पाटील, सहायक फौजदार निवृती चेके, जमादार, हवालदार शिवाजी बिलघे, अंमलदार गजानन राजपूत धोडप येथे पोहोचले. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अंत्यविधी न करता स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याचे आवाहन केले. मात्र, आक्रमक झालेल्या जमावाने रस्त्यावर मनुष्यवस्तीत सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार केले.

आणखी वाचा- फास्टफूड, जंकफूड खाल्ल्याने वडील रागावले, संतापाच्या भरात मुलीने…

प्रकरणी मृतदेहाची विटंबना करून रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची तक्रार शिवाजी बिलघे यांनी दिली. दरम्यान, मृतदेहाची अवहेलना करून हमरस्त्यावर अंत्यविधी केल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे. नातेवाइकांसह ३५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

आरोपीमध्ये सोमनाथ कोल्हे, फकिरबा कोल्हे, सोमनाथ सुदाम कोल्हे, रमेश कोल्हे, साहेबराव कोल्हे, कमला कोल्हे, सुभद्रा फकिरबा कोल्हे या नातेवाइकांसह ३० ते ३५ जणांचा समावेश आहे. त्यांच्या विरुद्ध भादंवि कलम २९७, सहकलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लक्ष्मण टेकाळे तपास करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funeral on the road amdapur police registered a case against 35 villagers scm 61 mrj
Show comments