लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : गेल्‍या पाच वर्षांतील राजकीय मोडतोडीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी तयार झालेल्‍या गोतावळ्यात प्रमुख पक्षांच्‍या नेत्‍यांची तोंडे चार दिशांनी असल्‍याचे चित्र दिसून आले आहे. अनेकांनी पक्ष बदलले आहेत, तर काहींनी पक्ष न बदलताही विरोधाचा सूर आवळला आहे. राजकीय निष्‍ठांच्‍या या लपंडावात अमरावतीतील उमेदवारांचे भवितव्‍य ठरणार आहे.

भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा या गेल्‍या निवडणुकीत काँग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आल्‍या होत्‍या. त्‍यांनी प्रतिस्‍पर्धी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. आनंदराव अडसूळ हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात म्‍हणजे महायुतीत असले, तरी ते राणा यांच्‍या विरोधात आहेत. प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू हे महायुतीत आहेत, पण त्‍यांनी नवनीत राणा यांच्‍या विरोधात प्रहारतर्फे दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. गेल्‍या निवडणुकीच्‍या वेळी प्रहारचे आमदार राजकुमार पटेल हे भाजपमध्‍ये होते, पण त्‍यावेळी त्‍यांनी नवनीत राणांचा प्रचार केला होता. ते आता राणांच्‍या विरोधात आहेत. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते संजय खोडके २०१४ च्‍या निवडणुकीच्‍या वेळी नवनीत राणा यांच्‍या विरोधात बंडाचे निशाण फडकवून पक्षातून बाहेर पडले होते. २०१९ च्‍या निवडणुकीच्‍या वेळी ते राष्‍ट्रवादीत परतले, पण ते राणांच्‍या प्रचारापासून दूर होते.

आणखी वाचा-नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

गेल्‍या पाच वर्षांमध्‍ये पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले असले, तरी राजकीय प्रतिस्‍पर्धेचे अनेक संदर्भ बदललेले नाहीत. २०१४ च्‍या निवडणुकीच्‍या वेळी संजय खोडके यांनी तत्कालीन बसपचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना पाठिंबा दिला होता. २०१९ च्‍या निवडणुकीच्‍या वेळी संजय खोडके यांनी आपली तलवार म्‍यान केली होती, तरीही नवनीत राणा यांच्‍या प्रचारात ते सहभागी झाले नव्‍हते. यावेळी महायुतीत असूनही त्‍यांचा राणाविरोध कायम आहे. त्‍यांच्‍या भूमिकेला त्‍यामुळेच महत्‍व प्राप्‍त झाले आहे.

नवनीत राणा यांनी नुकताच भाजपमध्‍ये प्रवेश केला. मात्र महायुतीतील शिवसेना शिंदे गट, प्रहार जनशक्‍ती पक्ष आणि राष्‍ट्रवादी अजित पवार गट यांच्‍या विरोधातून त्‍यांना वाटचाल करावी लागत आहे. भाजपमध्‍ये प्रवेश करण्‍याच्‍या आदल्‍या दिवशी नवनीत राणा यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी आग्रह धरणारे भाजपचे शहराध्‍यक्ष प्रवीण पोटे आणि इतर नेत्‍यांना राजकीय निष्‍ठा सांभाळत नवनीत राणा यांचे कौतुक करावे लागत आहे.

आणखी वाचा-नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…

काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे मुळचे रिपाइं गवई गटाचे नेते. दर्यापुरातून काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आले. पण, रिपाइं गवई गटाचे नेते राजेंद्र गवई त्‍यांच्‍यासोबत नाहीत. नव्‍याने धार्मिक समूहांना आपलेसे करण्‍यासाठी वानखडे यांनी नवनीत राणा यांच्‍यासोबत स्‍पर्धा चालवली आहे.

प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे. पण, उमेदवारी न मिळाल्‍याने प्रहारतर्फे रिंगणात उतरले. त्‍यांच्‍या उमेदवारीने समीकरणे बदलू शकतील, असा अंदाज व्‍यक्‍त केला जातो. त्‍यातच वंचित बहुजन आघाडीच्‍या पाठिंब्‍यावर रिंगणात असलेले रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे कितपत प्रभावी ठरणार, याचे औत्‍सुक्‍य आहेच.