गडचिरोली : एकीकडे अपुऱ्या सुविधेमुळे आरोग्य व्यवस्थाच आजारी पडल्याचे चित्र असताना डॉक्टरलाच दारू तस्करी करताना अटक करण्यात आल्याने गडचिरोली आरोग्य विभाग पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एटापल्ली तालुक्यातून १७ सप्टेंबरला ही संतापजनक घटना समोर आली. एका डॉक्टरला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामुळे आरोग्य वर्तुळ हादरले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रम्हानंद रैनू पुंगाटी (२९, रा. बारसेवाडा ता. एटापल्ली) असे त्या डॉक्टरचे नाव आहे. नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात तो कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. १५ सप्टेंबर रोजी पहाटे हालेवारा पोलीस मवेली – हालेवारा – पिपली बुर्गी या मार्गावर नाकाबंदी करत होते. यावेळी (एमएच ३३ टी ४४७८) ही तेथून जात होती. रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, पण चालकाने गाडी सुसाट नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पाठलाग करत रुग्णवाहिका थांबवून तपासणी केली असता आत देशी दारूचे १० बॉक्स व विदेशी दारूच्या ९६ बाटल्या आढळल्या. डॉ. ब्रम्हानंद पुंगाटीसह, शशिकांत बिरजा मडावी (३३ रा. एटापल्ली), सौरभ गजानन लेखामी ( २० रा. पिपली बुर्गी ), भिवाजी रैनू पदा (३१, रा. पिपली बुर्गी) यांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेत दिलीप लालू लेखामी (रा. पिपली बुर्गी) हा पळून गेला. याप्रकरणी हालेवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देशी – विदेशी ८८ हजार ६० रुपयांची दारू व रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा – सुवर्णवार्ता… गणेशोत्सव संपताच सोन्याच्या दरात घसरण.. हे आहेत आजचे दर…

जिल्ह्यातील दुर्गम भागात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेकांना जिवा गमवावा लागला आहे. अजूनही अशा घटना समोर येत असतात. पण या डॉक्टरने दारूतस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर केल्याने वैद्यकीय वर्तुळाला धक्का बसला आहे. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक अक्षय पाटील करत आहेत.

दोन दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, चारही आरोपींना १६ रोजी एटापल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

हेही वाचा – अमरावती : बॅनर फाडण्‍याच्‍या कारणावरून अचलपुरात दोन गटांत हाणामारी, दगडफेकीमुळे तणाव

तात्काळ बडतर्फी

पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हा परिषद सीईओ आयुषी सिंह यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रम्हानंद पुंगाटी यास तडकाफडकी बडतर्फ केले आहे. यात सहभागी अन्य कर्मचारी रडारवर आहेत. त्यांच्यावरही कारवाई अटळ मानली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli a doctor used to smuggle liquor in an ambulance police caught him ssp 89 ssb