गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांना पूर आला आहे. यामुळे अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तसेच गडचिरोली, आरमोरी या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने ११ ते १३ जुलैदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता शाळा आणि इतर सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शनिवार, १६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत या आदेशाला मुदतवाढ दिली आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी तीन दिवस घरातच कुटुंबासमवेत राहावे. जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेसह सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. शनिवार १६ जुलैपर्यंत शासकीय, निमशासकीय व अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये व इतर आस्थापने बंद राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीणा यांनी कळवले आहे.

Story img Loader