गडचिरोली : विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर डावलण्यात आलेल्या सर्वच पक्षातील इच्छुकांमध्ये खदखद आहे. परिणामी, आता आरोप- प्रत्यारोप सुरू झाले असून समाज माध्यमावर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. गडचिरोलीतसुद्धा अशाच एका ‘पोस्ट’ची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा आहे. यात १२ वी नापासांना संधी आणि उच्च शिक्षितांना डावलले, असा उल्लेख असून यात तीन काँग्रेस नेत्यांचे फोटो आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभेत काँग्रेसमध्ये नाराजांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सात जणांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, त्यांच्या मनधरणीचे पक्षाकडून प्रयत्न सुरू असले तरी समाज माध्यमावर मात्र उमेदवार निवडीवरून आरोप- प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक ‘पोस्टर’ सार्वत्रिक झाले आहे. यात गडचिरोलीतील काँग्रेसचे उमेदवार मनोहर पोरेटी, विश्वजित कोवासे आणि डॉ. सोनल कोवे यांचे फोटो आहेत. सोबतच ‘उच्च शिक्षित योग्य उमेदवार डावलून १२ वी नापास असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात विजय वडेट्टीवार यांना यश आले’ असा मजकूर देखील आहे.

हेही वाचा…अनिल देशमुख आणि डमी उमेदवार, काटोलमध्ये ट्विस्ट

उमेदवारी न मिळाल्याने विश्वजीत कोवासे आणि डॉ.सोनल कोवे नाराज आहेत. त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात खदखद आहे. यातूनच आता समर्थकांकडून ‘पोस्टरवॉर’ सुरू झाल्याने ऐन निवडणुकीत गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पोस्टर संदर्भात कोवे आणि कोवासे यांचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. परंतु गडचिरोलीतील राजकीय वर्तुळात सध्या याची खमंग चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बंडखोर उमेदवार विश्वजित कोवासे यांनी विधानसभा क्षेत्रात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे ते उमेदवारीवर ठाम राहणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. असे झाल्यास काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.

हेही वाचा…सावधान! दिवाळीत मिठाई विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

विरोधकांचे षडयंत्र

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या विजयामुळे विरोधक अस्वस्थ होते. विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसची बाजू भक्कम असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे अशाप्रकारे षडयंत्र रचून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु पक्षात सर्व आलबेल आहे. लवकरच सर्वांची नाराजी दूर करण्यात येईल. महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.